कास तलावाच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या दहा दिवसांपासून कास, बामणोली परिसरात पावसाची धुवांधार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे परिसरातील ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱया कास तलावाच्या पाणीपातळीतही झपाटय़ाने वाढ होत असून, जुने ब्रिटिशकालीन धरण भरले आहे. पाण्याची नव्या साठवण पातळीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे यंदा सातारकरांना मुबलक पाणीसाठा उलब्ध होऊन पाणीटंचाईचे संकट दूर होणार आहे.

जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांपासून या परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने शेतकरीही सुखावला आहे. ओढे, नाले दुथडी भरून वाहत असल्याने कोयना, उरमोडी, कण्हेर, तारळी या नद्यांच्या व कास तलावाच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. सातारा शहराला मुबलक पाणीसाठा होण्यासाठी कास धरणाच्या भिंतीची उंची वाढवण्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून प्रगतिपथावर आहे. धरणाच्या भिंतीचे व सांडव्याचे काही अपवाद तुरळक काम वगळता 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. धरणात यावर्षी मोठय़ा प्रमाणात पाणीसाठा होणार आहे. मुसळधार पावसामुळे तलावाच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होऊ लागली आहे. जुनी 20 फूट उंचीची पातळी पूर्ण होऊन पाणीपातळी 24 फुटांवर पोहोचली आहे. यंदा 40 फूट उंचीपर्यंत पाणी साठवले जाणार असून, 16 फूट पाणीपातळी अद्यापि भरण्यास शिल्लक आहे. पुढील आठ-दहा दिवस पावसाचा जोर असाच राहिल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरून नवीन सांडव्यातून पाणी वाहणार आहे. त्यामुळे यंदा सातारकरांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.