रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालकपदी

राज्याच्या पोलीस दलात दोन महत्त्वाचे बदल होणार आहेत. वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी वर्णी लागणार आहे. तर निवृत्तीच्या उंबरठय़ावर असलेले रजनीश सेठ हे स्वेच्छानिवृत्ती घेतील. मग त्यानंतर त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येईल असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.

वरिष्ठ आयपीएस अधिकारी रजनीश सेठ हे सद्यस्थितीत पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. ते येत्या डिसेंबर महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत; परंतु असे असताना सेठ हे स्वेच्छानिवृत्ती घेतील. मग त्यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येईल. तर आपल्या उलटसुलट कारभारामुळे वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांची राज्य शासन राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. रश्मी शुक्ला या जून 2024 रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. तसे पाहता नियमानुसार अधिकाऱयाला  निवृत्तीसाठी कमी कालावधी असल्यास त्यांची प्रमुख पदावर नियुक्ती केली जात नाही; परंतु नियमबाह्य सरकार राज्यात आल्यापासून कुठल्याच बाबी नियमानुसार होत नसल्याचे चित्र आहे. आताही राजकीय हेतूने प्रेरित होऊन आगामी निवडणुका डोळय़ासमोर ठेवत वादग्रस्त रश्मी शुक्ला यांना पोलीस दलाचे प्रमुख बनविण्यात येणार असल्याची पोलीस वर्तुळात चर्चा रंगली आहे. रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक बनणार असे वृत्त पसरताच पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांनी धसका घेतला असून ही नियुक्ती चुकीच्या पद्धतीने होणार असल्याचे बोलले जात आहे.