मी आयपीएस अधिकारी आहे, मला तीस हजार रुपये पाठवा असे सांगणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यातील एका शासकीय अधिकाऱ्याला त्याच्या वॉट्सअॅपवर एका अज्ञात इसमाकडून मी वरिष्ठ आय.पी.एस. पोलीस अधिकारी बोलत आहे अशा आशयाचा मेसेज आला, थोड्या वेळाने दुसरा मेसेज आला की मला ताबडतोब 30 हजार रुपये पाठवा. ते मी तुम्हाला दोन तासात लगेच परत देतो. या मेसेजमुळे शासकीय अधिकाऱ्याला शंका आली. त्याचदिवशी अनेक शासकीय अधिका-यांनादेखील अशाच प्रकारचे वॉटसअप मेसेज आले. त्यामुळे त्यांनी लगेचच सायबर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. सायबर पोलीस ठाण्यात या अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपीचा पोलीस शोध घेत होते. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक जनार्दन परबकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाकडून तांत्रिक बाबी व गुप्त खब-याकडून सातत्याने या इसमाचा पाठपुरावा करण्यात येत होता. अखेरीस हा आरोपी पंजाब राज्यातील पटियाला जिल्ह्यातील पसीयना तालुक्यात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पंजाब राज्याकडे हे पथक रवाना झाले. परंतु गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाईल हा दोन राज्यांच्या सीमेलगत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस पथकाला प्रथम अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

त्यानंतर केलेल्या तपासात हा मोबाईल पंजाब राज्यातील पटियाला तालुक्यातील एका महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले. या महिलेच्या मोबाईलवर दि.27 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2023 दरम्यान वॉट्सअॅपवर कॉलींग येणे बंद असल्याचे तपास पथकाच्या निदर्शनास आले. या महिलेचा वॉटसअप नंबर हा आरोपी इतर ठिकाणाहून वापरत असल्याचे निष्पन्न झाले. या महिलेला नियमित फेसबुकवर एक लकी ड्रॉ व्हिडीओ पाहण्याची सवय होती. त्यातील एका लकी ड्रॉ व्हिडीओमध्ये आपल्याला आयफोन व आयपॅड गिफ्ट म्हणून हवा असल्यास आपला मोबाईल नंबर खालील कमेंट सेक्शनमध्ये नमूद करा असे या जाहिरातीत सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे व्हिडीओच्या खालील कमेंट सेक्शनमध्ये या महिलेने आपला मोबाईल नंबर नमूद केला होता. याच नंबरचा वापर करत आरोपीने त्या महिलेला तुम्हाला आयफोन गिफ्ट लागला आहे आणि तो मिळवण्यासाठी तुमच्या मोबाईलवर आलेला एक ओटीपी शेअर करा असे कॉल करुन सांगितले. त्या महिलेने ओटीपी शेअर करताच आरोपीने या महिलेले वॉटसअप अकाऊंटचे अॅक्सेस घेतले व या वॉटसअप अकाऊंटचा वापर करुन त्याने अनेक लोकांना व पोलीस अधिकाऱ्यांना फसवणूकीचे कॉल करण्यासाठी वापरला. या पथकाकडून पुन्हा तांत्रिक विश्लेषण करण्यात आले असता असे निष्पन्न झाले की हा आरोपी राजस्थान राज्यात बसून वरिष्ठ आयपीएस पोलीस अधिका-याचा फोटो आपल्या वॉटसअपच्या डीपीवर ठेवून तोतयागिरी करून फसवणूकीचे कॉल करत होता.

या गुन्ह्यातील हा आरोपी आपले नाव व पत्ता बदलून वास्तव्य करत होता. त्यामुळे या तपासादरम्यान हे पोलीस पथक राजस्थान येथील भरतपूरमधील डिग येथे प्रचंड थंडीचा त्रास सहन करत आरोपीचा शोध घेत होते. अखेर दि.6 जानेवारी 2024 रोजी या गुन्ह्यातील आरोपी आबिद जाकर, वय 26, रा. सेशन, तालुका पहाडी, जिल्हा डिग, राजस्थान याला उत्तरप्रदेशातील मथुरा येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. आरोपी आबिद जाकर याने हा गुन्हा करण्याकरीता वापरलेला मोबाईल हॅण्डसेट जप्त करण्यात आला असून या गुन्ह्याचा अधिक तपास सायबर पोलीस ठाणे करत आहे. या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक जनार्दन परबकर, सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षक स्मिता सुतार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक योगेश खोंडे, पोलीस हवालदार शांताराम झोरे, बाळू पालकर, रमिज शेख यांच्या पथकाने सहभाग घेतला.