
आपल्या लाडक्या गणपतीबाप्पाच्या स्वागतासाठी चाकरमानी गावी दाखल झाले आहेत. कोरोनाच्या संकटातही कोणी लसीचे दोन डोस घेतले होते… आरटीपीसीआर चाचणी करून चाकरमानी कोरोनाचे संकट लवकर दूर कर हे साकडे विघ्नहर्त्यापुढे घालण्यासाठी आपल्या घरी पोहोचला आहे. घराघरामध्ये आता गणपतीच्या आगमनाची जय्यत तयारी झाली असून मखर आणि सजावटीमध्ये गणेशभक्त गुंतले आहेत. उद्यापासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यामध्ये 108 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव आणि 1 लाख 66 हजार 539 घरगुती गणेशोत्सव साजरे होणार आहेत.
जिल्ह्यामध्ये चेकपोस्टवर पोलीसांनी मदतकेंद्र सुरु केली आहेत. त्याठिकाणी 9 अधिकारी आणि 87 अंमलदार 24 तास दोन शिफ्टमध्ये सेवा बजावत आहेत. गावी येणाऱ्या चाकरमान्यांचे या मदतकेंद्रात स्वागत केले जात आहे. त्यांना पाण्याची बाटली आणि बिस्कीट दिले जात आहे. या मदतकेंद्रात येणाऱ्या चाकरमान्यांची स्वतंत्र नोंदवहीत नोंद केली जात आहे. जिल्ह्यातील 9 रेल्वे स्थानकातही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बॉम्ब शोध आणि नाशक पथकही कार्यरत ठेवले आहे. गणेशोत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी 58 पोलीस अधिकारी व 700 पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर तैनात आहेत. त्याचबरोबर नाशिक येथून 20 प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरिक्षक, जालना पोलीस प्रशिक्षण केंद्रातून 100 प्रशिक्षणार्थी पोलीस अंमलदार, 350 पुरुष होमगार्ड, 50 महिला होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात आहेत.


























































