
राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष दिलीप उर्फ नाना मयेकर यांचे कोरोनामुळे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात नाना मयेकर यांचे उल्लेखनीय काम आहे. दिलीप उर्फ नाना मयेकर यांना चार दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी रात्री त्यांना कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र आज त्यांचे दुर्दैवी निधन झाले.
नाना मयेकर यांनी मालगुंड आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मोहिनी मुरारी मयेकर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली. ग्रामीण भागातील अनेक मुले आणि मुली दहावी आणि बारावीनंतर शिक्षण सोडतात. त्यांना शहराच्या ठिकाणी शिक्षण घेणे परवडत नाही, हे ओळखुन नाना मयेकर यांनी चाफे येथे महाविद्यालयही सुरु केले होते. मालगुंड शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते़. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते माजी संचालक होते.
कबड्डी खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी काम केले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून साहित्यिक चळवळीत त्यांचा सहभाग होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते कार्यरत होते. अलिकडेच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नागिरी तालुकाध्यक्षपदी निवड झाली होती. नाना मयेकर यांच्या निधनानंतर रत्नागिरीवर शोककळा पसरली.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी श्रध्दांजली वाहताना नाना मयेकर यांच्या जाण्याने रत्नागिरीच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे, असे म्हटले. तसेच माझ्या राजकीय जिवनाची सुरुवात नानांच्या साक्षीने झाली असे सांगताना त्यांनी युवक जिल्हाध्यक्ष असताना नानांनी केलेल्या सत्काराची आठवण सांगितली.




























































