रोहित-विराटमध्ये मनोमिलन! मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले पॅचअप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या वन डे संघाचा कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये मतभेद असल्याची चर्चा रंगू लागली. टीम इंडियाच्या या दोन दिग्गज क्रिकेटपटूंचे मैदानातील वागणं आणि सोशल साइटवर ‘अनफॉलो’ करणे यामुळे दोघांमधील वाद सर्वांसमोर येत होते. पण इंग्लंडविरुद्धच्या नुकत्याच पार पडलेल्या मालिकेत दोघांची फ्रेंडशिप क्रिकेटच्या पिचवर दिसून आली. कोरोनाच्या काळात विलगीकरण, क्वारंटाइनमुळे अधिकाधिक वेळ दोघांनी एकमेकांसोबत घालवला. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मार्गदर्शन करीत दोघांचे मनोमिलन घडवून आणले. याचा फायदा हिंदुस्थानी संघाला झाला. कसोटी, टी-20 व वन डे या तिन्ही प्रकारांत यजमान टीम इंडियाने इंग्लंडला धूळ चारली. अशा प्रकारचे वृत्त मीडियामधून समोर आले आहे.

हिंदुस्थानी क्रिकेटला होणार फायदा

विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यामधील सलोख्याबाबत सूत्रांकडून यावेळी सांगण्यात आले की, हिंदुस्थानने मागील चार महिन्यांमध्ये दोन महत्त्वाच्या मालिका जिंकल्या. ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या दोन्ही संघांना पराभूत करीत वर्चस्व प्रस्थापित केले. या कालावधीत आणखी एक महत्त्वाची बाब घडली. विराट कोहली व रोहित शर्मा यांनी एकमेकांसोबत वेळ घालवून आपल्यातील वाद बाजूला ठेवले. क्रिकेट व देशाचा विचार केला. भविष्यातील आव्हानांकडे गांभीर्याने लक्ष दिले. याचा फायदा आता हिंदुस्थानी क्रिकेटला होणार आहे.

बाहेरच्या चर्चांमुळे कटुता

विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यात आलबेल नसल्याच्या चर्चा सातत्याने होत होत्या. या ड्रेसिंग रूमबाहेरच्या चर्चांमुळे कटुता निर्माण होत होती. याचा फायदा प्रतिस्पर्ध्यांना होत होता. या दोघांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले. कोरोनाच्या कालावधीत बायो-बबल (जैव सुरक्षित वातावरण) राहताना दोघांनी पहिल्यांदाच एकत्रितपणे बसून यावर विचार केला आणि दुरावा दूर झाला.

टीकाकारांना उत्तर

विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यामध्ये मतभेद असल्याचे वृत्त सातत्याने समोर येत होते. त्यामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम लावण्याची नितांत गरज होती. रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले. विराट कोहली व रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सातत्याने एकमेकांशी संवाद साधत होते. टी-20 मालिका संपल्यानंतर फोटोसाठीही दोघे एकत्र आले. याआधीही हे होत होते, पण आता टीकाकारांना उत्तर देण्यासाठी दोघांनी हे पाऊल उचलले, अशी माहिती सूत्रांकडून यावेळी देण्यात आली.