अश्विनने रचला इतिहास, कसोटीत 500 विकेटचा माइलस्टोन पार; कुंबळे-वॉर्नला मागे सोडलं

राजकोटमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी लढतीत हिंदुस्थानचा फिरकीपटू आर अश्विन याने इतिहास रचला. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्सचा माइलस्टोन पार केला आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावात जॅक क्राऊली याची विकेट घेताल त्याने हा कारनामा केला. विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट घेणार अश्विन फक्त दुसरा हिंदुस्थानी खेळा़डू आहे.

आर. अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज ठरला. अश्विनने 98व्या कसोटीमध्ये हा माइलस्टोन गाठला. कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान 500 विकेट श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन याच्या नावावर असून त्याने 87 कसोटीत हा टप्पा गाठला होता.

हिंदुस्थानचा दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे याला एवढ्याच विकेट घेण्यासाठी 105 कसोटी सामने खेळावे लागले होते. तर ऑस्ट्रेलियाचा दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्न याने 108व्या कसोटीत हा टप्पा गाठला होता. याचाच अर्थ अश्विनने कुंबळे आणि वॉर्नला मागे सोडले आहे.

दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट घेणारा अश्विन नववा आंतरराष्ट्रीय गोलंदाज आहे. यातील पाच खेळाडू फिरकीपटू आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 800 विकेट मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. दुसऱ्या स्थानावर शेन वॉर्न (708 कसोटी), जेम्स अँडरसन (695* विकेट्स) तिसऱ्या स्थानावर आहे. तर हिंदुस्थानकडून सर्वाधिक कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट अनिल कुंबळेच्या नावावर आहे. त्याने 132 कसोटीत 619 विकेट घेतल्या आहेत. 74 धावांमध्ये 10 विकेट ही कुंबळेची सर्वोत्तम कामगिरी आहे.