
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमी फायनल लढतीत रवींद्र जाडेजाच्या दमदार खेळीनंतरही हिंदुस्थानला न्यूझीलंडकडून पराभव सहन करावा लागला. या लढतीत जाडेजाने एकाकी झुंज देत 59 चेंडूत 77 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. संघ खराब स्थितीत असताना जाडेजाने केलेल्या या झुंजार खेळीचे सर्वांनी कौतुक केले होते. परंतु ‘बॉम्बे टाइम्स’शी बोलताना पत्नी रिवाबाने पराभवानंतर जाडेजाला सांभाळणे झाले होते कठीण असा खुलासा केला आहे.
‘हिंदुस्थानच्या पराभवानंतर जाडेजा नाराज झाला होता. मी बाद झालो नसतो तर आम्ही जिंकलो असतो, असे तो सतत बोलत होता. त्यावेळी त्याला सांभाळणे कठीण झाले होते, असे रिवाबा म्हणाली. तसेच एवढ्या जवळ येऊनही पराभव झाल्यानंतर दु:ख होतेच आणि पराभव स्वीकारण्यास थोडा वेळ लागतो, असेही त्या म्हणाल्या.
रिवाबा पुढे म्हणाल्या की, ‘जाडेजाचा इथपर्यंतचा प्रवास पाहिला तर त्याने नेहमीच खराब परिस्थितीत चांगले काम करून दाखवले आहे. त्याने गोलंदाजीत बळीही घेतले आहेत, तसेच फलंदाजीत महत्त्वपूर्ण खेळीही केली आहे. 2013 ला हिंदुस्थानने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती तेव्हाही जाडेजाने अष्टपैलू कामगिरी करत फायनलमध्ये सामनावीरचा पुरस्कार पटकावला होता.
सेमी फायनलमध्ये अष्टपैलू कामगिरी
जाडेजाने वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये अष्टपैलू कामगिरी केली होती. या लढतीत गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात जाडेजाने छाप सोडली होती. गोलंदाजीत एक बळी घेत त्याने एक रनआऊट आणि दोन झेलही घेतले. तसेच धावांचा पाठलाग करताना धोनीसोबत 100 धावांची भागिदारीही केली. परंतु दुर्दैवाने तो बाद झाला आणि हिंदुस्थानने सामना गमावला.





























































