साहित्यजगत – बाकी शिल्लक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रविप्रकाश काकर्णी

वैद्यकीय डॉक्टर होणे हे सगळ्यांना शक्य होत नाही. मग ही माणसं नंतर काय करतात? अशांपैकीच एक जण. या व्यक्तीने आपल्या मनाची  रुखरुख, शल्य म्हणा, कमी केलं ते पीएच.डी. करून. त्यांचा विषय होता ‘वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचे वाङ्मयीन व्यक्तित्व व कर्तृत्व’, वर्णनात्मक सूचीच्या आधारे. या कामात त्यांची आठ वर्षे गेली. हा सगळा खटाटोप करणारे आहेत नागेश कांबळे. कुसुमाग्रज यांचा अभ्यास करताना कांबळे यांनी केवळ उपलब्ध पुस्तकांवर सगळी भिस्त ठेवली नाही, तर वेगवेगळ्या साप्ताहिकांतून, मासिकांतून आणि दिवाळी अंकांतून कुसुमाग्रजांचे जे जे साहित्य मिळाले ते जमा करत गेले.

इथे कुसुमाग्रजांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगायला हवं. वि. वा. शिरवाडकर म्हणजे एक अजब व्यक्तिमत्त्व होतं. त्यातदेखील कुसुमाग्रज नावाचा कवी त्यांच्यात जो दडलेला होता त्याचा चेहरामोहरा वेगळाच. त्यांच्यात जो अनासक्तपणा होता, ते पाणी काही वेगळंच होतं. कुसुमाग्रज हे नाव फारसं प्रकाशमान झालं नव्हतं त्या वेळेपासून त्यांचा हा प्रकृतिधर्म होता हे विशेष. त्यांच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या आणि काही जणांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्याचे कौतुकही झाले. अशा वेळी कोणालाही आपला कवितासंग्रह यावा असे वाटेल की नाही?

पण हे आपले निवांत! पण ही काळजी पडली कोल्हापूरच्या वि.स.खांडेकर यांना. त्यांनी या कवीच्या बऱ्याच कविता जमवल्या होत्या, पण कवितासंग्रह होण्याइतक्या त्या नव्हत्या. तेव्हा त्यांनी या कवीला त्यांच्याकडे असलेल्या कविता पाठवायला सांगितल्या, शेवटी वि. स. खांडेकरांनी आपल्यापरीने या कवीच्या कविता गोळा केल्या. शिवाय कर्ज काढून या कवीचा कवितासंग्रह प्रकाशित केला. अर्थात प्रकाशक म्हणून त्या वेळी कोल्हापुरात प्रसिद्ध असलेल्या मोघे प्रकाशनाचं नाव होतं. हा कवितासंग्रह म्हणजेच ‘विशाखा’. ‘विशाखा’मुळे ‘विशाखा’ म्हणजे कुसुमाग्रज, हे समीकरण कायमचं झालं. आणखी एक आठवण. एकेकाळी ‘कुमार’ मासिकाचे संपादक कुसुमाग्रजांचे भाऊ होते. मासिक पुण्याहून निघायचं. अंक क्लोज करायची वेळ आली तरी कुसुमाग्रजांची कविता काही यायची नाही. शेवटी फोन, तारा अशा भानगडी करून त्यांची कविता यायची. अशा बालकवितांचा संग्रह काढावा म्हणून ज्योत्स्ना प्रकाशनचे परांजपे कुसुमाग्रजांकडे गेले आणि म्हणाले, “तुमच्या बालकविता द्या. आम्ही त्यांचा कवितासंग्रह काढतो.” तेव्हा कुसुमाग्रज म्हणाले, “माझ्याकडे त्या कविता नाहीत.” तेव्हा तिथे शांता शेळके आलेल्या होत्या. त्या म्हणाल्या, “माझ्याकडे आहेत काही आणि काही माझ्या पाठ आहेत.” अशा रीतीने त्यांचा बालकवितांचा संग्रह आला!

 तात्पर्य,  कुसुमाग्रजांचा कवितासंग्रह काढणं हे काम सोपं नव्हतं. कुसुमाग्रजांच्या कविता दिवाळी अंकात येत. ती कविता ज्या दिवाळी अंकात येई, तो दिवाळी अंक ते ठेवतीलच असं नव्हतं. पुढे तो अंक कोणी नेला हेदेखील ते विसरून जात. पुढे कुणीतरी कवितासंग्रह काढायच्या वेळी म्हणे, “तात्या, ती अमुकतमुक कविता हवी.” मग तात्या म्हणत, “अरे हो, ही दिवाळी अंकात गेली होती.” शेवटी दोन-चार दिवाळी अंकांच्या संपादकांना कुसुमाग्रज पत्र पाठवून दिवाळी अंक परत मागवून घेत. तर कुसुमाग्रजांच्या कविता सांभाळणं, मिळवणं हा एक व्यापच असायचा. अशा दुर्लक्षित किंवा आडबाजूला प्रसिद्ध झालेल्या कवितांची नोंद कोण कशाला ठेवतो? त्यामुळे कांबळे यांच्या लक्षात आलं की, कुसुमाग्रजांच्या एकूण 67 ग्रंथांत त्यांच्या प्रकाशित झालेल्या साहित्याखेरीज आपल्याकडे बरंच साहित्य जमा झालेलं आहे. ज्यात कथाकविता, व्यक्तिचित्रे, बालकविता  आणि टागोरांच्या कवितेचे त्यांनी केलेले अनुवाद आहेत.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांचा हा बहुमोल ठेवा रसिकांसाठी आणि अभ्यासकांसाठी उपलब्ध होणे गरजेचे आहे यासाठी ते प्रकाशक शोधू लागले. पण प्रकाशक, प्रतिष्ठानं, साहित्य संस्कृती मंडळ यांनी कुणीच त्याबाबत उत्सुकता दाखवली नाही. शेवटी नागेश कांबळे थकले, निराश झाले. हे सगळे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून आले. त्यामुळे बाकी कोणी नाही, पण एकाला वाटू लागले, आपण हा ठेवा प्रसिद्ध करायला पाहिजे. त्यांनी आपणहून कांबळे यांची गाठभेट घेतली आणि चक्क  दोन पुस्तके प्रकाशित केली. या प्रकाशनाचे नाव आहे ‘रावण पब्लिशिंग हाऊस’. कुसुमाग्रजांच्या पुस्तकांची नावेदेखील आहेत…‘क’ आणि दुसरं ‘ख’! नागेश कांबळे यांना कृतकृत्य वाटलं यात काय आश्चर्य? अशा वेळी त्यांना कुसुमाग्रजांची कविता आठवली असेल…

मीच माझ्यातून आज, किती दूर दूर आलो 

कालपरवाच्या मला, मीच अनोळखी झालो               

निळे दाह ममतेचे, देहतेचे लाल जाळ 

सारे दीप विझवीत, चाले ज्यावर काळ 

सूर्य उगवतो रोज, थांब म्हणतो मी त्यास 

देई ओंजळीत देवा, चार चैतन्याचे श्वास