
>> रविप्रकाश कुलकर्णी
कुणी म्हणेल हिराबाई बडोदेकर यांच्यावर याआधी राजाराम हुमणे यांचं ‘धन्य जन्म जाहला’ आणि त्यानंतर अरुण हळबे आणि शैलजा पंडित यांचं ‘गानहिरा’ ही चरित्रं असताना रोहन प्रकाशनच्या डॉक्टर शुभदा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘हिराबाई बडोदेकर: गायन कलेतील तारषडज’ या चरित्र ग्रंथाचं प्रयोजन काय? याचे उत्तर असं सांगता येईल की, वरील दोन्ही चरित्रं आता उपलब्ध नाहीत. अशा वेळी हिराबाईंसारख्या अलौकिक कलावतीचं चरित्र, आदर्श कसा असावा हे नव्या पिढीला कळण्यासाठी तरी चरित्र उपलब्ध असायला हवे. लेखिका शुभदा कुलकर्णी आपल्या मनोगतात म्हणतात, “मी एक संगीतप्रेमी विद्यार्थिनी. गायिकांविषयी संशोधन करताना त्यावेळच्या सामाजिकतेचा अभ्यास करताना या सर्वच गायिकांनी घडवलेली गायकी आणि समाज मानसिकता यांचं मनोहारी दर्शन मला झालं.” त्यामध्ये त्यांना हिराबाई जशा भावल्या, जाणवल्या तशा मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे.
या पुस्तकाचे चटकन वेगळेपण सुरुवातीलाच जाणवले ते म्हणजे पुस्तकाच्या आरंभीच अब्दुल करीम खान यांचा दिलेला फोटो. त्याखाली दिलेले आहे, ‘हिराबाईंचे वडील कैलासवासी अब्दुल करीम खान’. एक काळ होता, ही गोष्ट झाकून ठेवण्याचा प्रकार व्हायचा. खुद्द हिराबाईंनादेखील काही काळ ही बाब संकोचाची वाटायची. जातीभेदापलीकडे पहायचं असतं हा विचार हळूहळू का होईना, रुजू लागला आणि हिराबाई आपल्या पित्याचे नाव उघडपणे सांगू लागल्या. ‘गानहिरा’ या पुस्तकात या खाणाखुणा सापडतात. तसंच शुभदा कुलकर्णी यांच्या पुस्तकात प्रथमच हिराबाईंच्या आई ताराबाई माने यांचा ठसठशीत आणि मोठा फोटो छापलेला आहे. या चरित्रात हिराबाईंच्या अनेक आठवणी ज्या पूर्वीच्या पुस्तकात होत्या, त्या येणं अपरिहार्यच. त्यातल्या एका गोष्टीकडे लक्ष वेधतो.
‘हिराबाईंच्या भाग्याने आणि कर्तृत्वाने स्वातंत्र्य चळवळीतल्या कार्यकर्त्या, उच्चशिक्षित, उत्तम कवयित्री सरोजिनी नायडू एकदा स्वत हिराबाईंकडे आल्या आणि राष्ट्रपिता गांधीजींना त्यांचं गाणं ऐकायचं असं म्हणाल्या. त्या दिवशी गांधींचं मौनव्रत होतं. त्यांना एक तासभर मीरेची भजनं ऐकायची होती असं त्यांनी लिहून दिलं. हिराबाईंना कितीतरी भजनं येत होती मीरेची! त्यानुसार हिराबाई गायल्याही. गांधी चरख्यावर सूत कातत मन लावून गाणे ऐकत होते. मान डोलवून गाणं आवडल्याचं दर्शवत होते. हिराबाईंनी आशीर्वाद मागितल्यावर गांधीजींनी लिहिलं, ‘तुम्ही लोकांसाठी खूप गायलात, आता ईश्वरासाठी गात चला. आता परमेश्वराला तुमचे गाणे ऐकवा’.‘ गानहिरा’ पुस्तकात लिहिले आहे – या प्रसंगानंतर 37 वर्षांनी माझ्या प्रश्नाला उत्तर देताना हिराबाई म्हणाल्या, गांधीजी राजकारणी वाटतच नसत. ते साधूच वाटायचे. त्यांचं ते वाक्य प्रत्येक गाण्याच्या, सभेच्या वेळी आठवायचं.’ त्यानंतर हिराबाई सांगतात ते महत्त्वाचं आहे, त्याकडे लक्ष वेधतो. वहिद खांसाहेबही म्हणायचे, तुमचा आवडता भगवान श्रोत्यांच्या रूपात समोर असतो. तेव्हापासून मला वाटायचं की, आपली सेवा चोख रुजू झाली पाहिजे. तीच खरी ईश्वरभक्ती आहे.
वहीद खांसाहेबांचे हे उत्तर इतके मार्मिक आणि मुद्देसूद आहे. त्यामुळे हिराबाईंसारख्या चतुरस्र गायिकेचं गाणं आम्हाला लाभलं. एरवी हिराबाईंनी गांधीजींचं ऐकलं असतं तर त्या केवळ भजनंच म्हणत राहिल्या असत्या! तर या पुस्तकात एक दुर्मिळ आठवण आली आहे. 1989 मध्ये हिराबाईंना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या मुंबईला पुरस्कार घ्यायला जाऊ शकल्या नाहीत. तेव्हा लता मंगेशकर स्वत त्यांच्या घरी गेल्या. हिराबाईंच्या पाया पडल्या. तेव्हा हिराबाईंनी लताच्या गळ्याला हात लावून नमस्कार केला. त्यावर लताबाई म्हणाल्या, “आत्या, तुम्ही हे काय करताय? लहान असताना मुंबईला तुमच्या मांडीवर डोकं ठेवून मी तुमचा रियाज ऐकला आहे.” यावर हिराबाई म्हणाल्या, “मी तुझ्या गळ्यातल्या सरस्वतीला नमस्कार करते आहे.”
दोघींच्याही डोळ्यांत पाणी आलं. लताबाईंनी हिराबाईंना विचारलं, “इतकं सगळं तुम्ही मिळवलं, आणखी काही मिळवण्याची इच्छा आहे का?”
हिराबाई उतरल्या, “मला तुझ्यासारखा आवाज मिळावा.” लताबाई पुन्हा भावविवश झाल्या. हिराबाईंनी लताबाईंना विचारलं, “तू ही इतकी मोठी गायिका झालीस. तुझी आणखी काही इच्छा आहे का?”
लताबाईंना हा प्रश्न अनपेक्षित असावा. त्यांनी उत्तर दिलं, “मला तुमच्यासारखा आत्मा मिळावा!” थोडय़ा दिवसांत 20 नोव्हेंबर 1989 रोजी हिराबाई गेल्या. या दुर्मिळ आठवणीसाठी तरी हे पुस्तक लक्षात राहील.


























































