साहित्य जगत – अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला जाताना…

>> रविप्रकाश कुलकर्णी

घुमानसारख्या आडवळणी राज्यात भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला जर मी जाऊ शकतो, तर आता मी कुठेही भरणाऱया अखिल भारतीय साहित्य संमेलनाला जाऊ शकतो, हे मी उदगीर, वर्धा येथे भरलेल्या अखिल संमेलनाच्या वेळी म्हटले होते. अशा वेळी अमळनेर येथे भरणाऱया साहित्य संमेलनाला मी जाणार हे उघडच आहे. आजकाल माणसे एकलकोंडी होऊ लागली आहेत. त्यांच्यातील संवाद जवळ जवळ तुटल्यासारखा आहे.अशा वेळी साहित्याच्या निमित्ताने का होईना काही माणसे एकत्र येऊन काहीतरी विचार करतात, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. आपल्या कोशातून बाहेर पडून काय घडतेय याची जाण येण्यासाठी, बघेपणाची वृत्ती टाळण्यासाठी तरी आज एकमेकांना भेटण्याची गरज आहे. साहित्य संमेलन हे अशासाठी एक साधन आहे असे मला वाटते.

अमळनेर म्हटले की, सानेगुरुजींची आठवण येणे अपरिहार्य आहे. गोष्टी घडायच्या असल्या की कशा घडतात ते पहा. माणसाचे पोट कुणाला कुठे व कसे नेईल हे सांगणे कठीण. कुणी एक जण मुंबईला आला, पण त्याची नोकरीच्या ठिकाणी नियुक्ती झाली नाही. म्हणजे तसा निर्णय व्हायला वेळ लागणार होता. त्याच वेळी अमळनेरच्या शाळेने त्याला शिक्षक म्हणून तातडीने बोलावून घेतले आणि इथूनच त्या व्यक्तीच्या आणि अमळनेरच्या इतिहासाला एक नवे बळ मिळाले. ही व्यक्ती म्हणजे पांडुरंग सदाशिव साने. ज्यांना पुढे अमळनेरकर सानेगुरुजी असे म्हणू लागले आणि तेच नाव पुढे कायमचे रूढ झाले.

11 जून 1950 ला गुरुजींचे या जगातून निर्वाण झाले. तरीदेखील त्यांचे स्मरण आजतागायत अगदी नव्या पिढीनेदेखील जागते ठेवलेले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी निर्माण केलेला ‘श्यामची आई’ हा चित्रपट. वास्तविक आचार्य अत्रे यांनी 1953 मध्ये ‘श्यामची आई’ चित्रपट निर्माण केला आणि त्यावर स्वतचा अमिट असा ठसा उमटवला आहे. असे असूनदेखील नवा दिग्दर्शक सुजय सुनील डहाके याने दिग्दर्शित केलेला नवा ‘श्यामची आई’ तेवढय़ाच ताकदीने सादर केला.
त्याच वेळी हेदेखील सांगायला पाहिजे की, साधना प्रकाशनने नव्या चित्रपटातील फोटो समाविष्ट करून ‘श्यामची आई’ पुस्तकाची विशेष आवृत्ती काढली आहे. 1952 साली अमळनेरला कृ. पां. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र साहित्य संमेलन भरले होते, तर आता 2024 मध्ये फेब्रुवारी 2, 3, 4 या काळात रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली अमळनेरलाच साहित्य संमेलन भरत आहे.

एवढा कालावधी होऊनही संमेलनात सानेगुरुजींचा, त्यांच्या साहित्याचा, त्यांच्या विचारांचा पुनर्विचार करायला लावतो आहे. सानेगुरुजींचे सर्व व्यापकत्व असे टिकून आहे. या संमेलनात गुरुजींची पुतणी सुधा साने बोडा यांचा सत्कार होणार आहे. त्यांच्याबाबत थोडे सांगायला हवे. ‘श्यामची आई’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती, त्यांचे प्रकाशक आणि नंतर दुसऱया आवृत्तीपासून ते या पुस्तकाचा कॉपीराइट होईपर्यंत जे प्रकाशक होते ते म्हणजे पुणे विद्यार्थी गृह यांचा त्यांनी जो धांडोळा घेतला आहे तो अपूर्व असाच आहे. विशेषत: कॉपीराइटसंदर्भात त्यांनी जो शोध घेतला आहे तो महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने ‘श्यामची आई वाटचाल एका साहित्यकृतीची’ हे पुस्तक आवर्जून पाहायला पाहिजे.
अमळनेर म्हटले की, वा. रा. सोनार यांचे चेतश्री प्रकाशन याची आठवण होणार. संमेलन म्हटले की, राबणारे हात लागतात. गेली काही महिने तिथले डॉ. अविनाश जोशी अनेकांना बरोबर घेऊन झटत आहेत. गिरीश चौक, केदार ब्रम्हे, तेथील साहित्यिक संस्था, साहित्य परिषद या सगळय़ांची त्याला साथ आहे. शिवाय अमळनेर निवासी पण आता जळगावला स्थायिक झालेले चंद्रकांत भंडारी तेथे असणारच. शिवाय समन्वयक प्रा. डॉ. नरेंद्र पाठक सगळे सांभाळून घ्यायला आहेतच… अहिराणीचे अभ्यासक, साहित्य अकादमीचा भाषा सन्मान पुरस्कार ज्यांना लाभला ते ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील यांची गाठभेट तेथे होईलच. तेथे त्यांची दोन नवी कोरी पुस्तके प्रकाशित होत आहेत.

थोडक्यात काय, खान्देशमधील साहित्यिक वातावरण काल काय होते, आज काय आहे याची चाहूल घेण्याकरिता मी अमळनेरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला निघालो आहे…