
शालेय शिक्षण विभागाने 30 जून 2022 रोजी रात्रशाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तीबाबत काढलेल्या शासन निर्णयावरील स्थगिती उठविण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा रात्रशाळांमध्ये दुबार शिक्षकांची नेमणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर या शासन निर्णयानुसार रात्रशाळेची वेळ साडेतीन तासांवरून केवळ अडीच तास होणार आहे.
शासन निर्णयानुसार राज्यात अतिरिक्त शिक्षक उपलब्ध नाहीत याची खात्री करून रात्रशाळांमधील रिक्त जागांवर दिवसा शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांना पुन्हा रात्रशाळेतही शिकविण्याची परवानगी दिली आहे. रात्रशाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना अर्धवेळ शिक्षक म्हणून परवानगी असणार आहे. रात्रशाळेत दुबार शिक्षक नेमताना सदर शिक्षकांना नियमित शाळेत शिकविण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
या शासन निर्णयाला त्यावेळी विविध शिक्षक संघटनांनी विरोध केला होता. विरोधानंतर या शासन निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. तसेच अनेक संघटनांनी दिवसाच्या शाळेतील नियमित पगार घेणाऱ्या या शिक्षकांसाठी रात्रशाळेतील पगाराचीदेखील सोय करण्याऐवजी टीईटी पात्र बेरोजगार शिक्षकांची रात्रशाळेत नियुक्ती करण्याची मागणी केली होती. मात्र शालेय शिक्षण विभागाने 30 जूनच्या शासन निर्णयावरील बंदी उठविल्याने पुन्हा एकदा दुबार शिक्षकांची रात्रशाळांमध्ये वर्णी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दुबार शिक्षक कार्यरत असताना मार्च 2017 मध्ये रात्रशाळांचा दहावीचा निकाल 60.88 टक्के इतका लागला, तर मार्च 2022 मध्ये फक्त रात्रशाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांमुळे रात्रशाळेच्या दहावीच्या निकालात तब्बल 20 टक्क्यांनी वाढ होऊन 80.08 टक्के निकाल लागला.
शिक्षकांची बीएलओ डय़ुटीतून सुटका
मुंबईतील रात्रशाळांसाठी मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या कार्यकक्षा निश्चित करण्यात आल्या असून रात्रशाळेतील शिक्षकांना बीएलओ डय़ुटी न देता अतिरिक्त शिक्षकांना बीएलओची कामे देण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या शिक्षकांना अर्धवेळ शिक्षकाचा दर्जा असल्याने त्यांना पूर्णवेळ वेतन मिळणार नाही. रात्रशाळा पूर्ववत सुरू राहतील याची काळजी घेणे व रात्रशाळांना भेटी देऊन त्यांची तपासणी करण्याची कामे या समितीने करायची आहेत.


























































