
‘पवित्र’ पोर्टलद्वारे राज्यात सध्या सुरू असलेल्या शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यावर लोकसभा निवडणुकीचे सावट घोंगावत आहे. राज्यात एप्रिलमध्ये लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरतीबाबत सूचना जारी केल्या आहेत. भरतीची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण न झाल्यास ती पुढे निवडणुकीनंतर पूर्ण करण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील रिक्त असलेल्या 21 हजार 678 जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. पात्र उमेदवारांनी ‘पवित्र’ पोर्टलवर मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह अशा दोन प्रकारातील कोणत्याही एका प्रकाराचे प्राधान्यक्रम लॉक केले असतील, तर उमेदवार पदभरतीसाठी त्या त्या लॉक केलेल्या प्राधान्यक्रमासाठी विचारात घेतला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पदभरती पूर्ण न झाल्यास ती पुढे पूर्ण केली जाईल. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अनावश्यक चिंता करू नये, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध केलेल्या न्यूज बुलेटीनद्वारे करण्यात आले आहे.
चुकीची माहिती पसरविणाऱयांवर पोलिसांचा वॉच
काही उमेदवार शिक्षक पदभरतीबाबत समाजमाध्यमातून वेगवेगळय़ा प्रकारची चुकीची माहिती पसरवत आहेत. पात्र उमेदवारांनी अशा चुकीच्या माहितीकडे दुर्लक्ष करावे. समाजमाध्यमावर (उदा., टेलीग्राम, व्हॉटसअॅप, यूटय़ूब, इन्स्टाग्राम इत्यादी) चुकीची माहिती, स्वतःचे चुकीचे मत प्रदर्शित करून पात्र उमेदवारांमध्ये प्रक्षोभक, नैराश्याची भावना निर्माण करणाऱया व त्यांचे समर्थन करणाऱयांवर पोलीस विभागाला लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
लवकरच शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा
शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये ज्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे किंवा स्वप्रमाणपत्र अपूर्ण ठेवल्यामुळे अथवा विहित मुदतीत स्वप्रमाणपत्र प्रमाणित न केल्यामुळे अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे सध्याच्या पदभरती प्रक्रियेत सहभागी होता येत नाही,अशा उमेदवारांना नव्याने येणाऱया जाहिरातीच्या दुसऱया टप्यासाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण व दुरुस्त करण्याची संधी दिली जाईल, असेही न्यूज बुलेटीनमध्ये म्हटले आहे.


























































