
सूर्य आग ओकत असल्याने संपूर्ण राज्यात उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. अन्य शहरांच्या तुलनेत विदर्भातील पारा 45 सेल्सियसच्या पुढे गेल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. हवामान विभागाने विदर्भातील तीन जिल्ह्यांना तीन दिवस ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. यामध्ये विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे.
विदर्भातील अकोला, वर्धा आणि अमरावती या तीन जिल्ह्यांतील तापमान 46 अंश सेल्सियसच्या पुढे गेल्याने येथील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. सुभाष टाले यांनी विदर्भातील या तापमानवाढीचे थेट कनेक्शन समुद्राच्या वाढत्या तापमानाशी जोडले आहे.
ब्रह्मपुरीचा पारा 47.1
आज सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे 47.1 अंश सेल्सिअसपर्यंत झाली. विदर्भात अघोषित संचारबंदी लागू झाली आहे. चंद्रपूर 46.8, गडचिरोली 46.4, नागपूर 46, वर्धा 46.4, अमरावती 45.8, भंडारा 45, गोंदिया 45.2, यवतमाळ 45, अकोला 44.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
तापमानवाढीची प्रमुख कारणे
अकोल्यातील आसपासचा हा परिसर देशाच्या अंतर्गत भागात असल्यामुळे येथे समुद्राचा थंडावा पोहोचत नाही. परिणामी, उन्हाळ्यात जमीन लवकर आणि वेगाने तापते. उन्हाळा लांब, कोरडा आणि धोकादायक बनतोय. वाढते शहरीकरण, रस्ते रुंदीकरण आणि अनिर्बंध बांधकामांमुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याने नैसर्गिक सावली आणि थंडावा नष्ट झाला आहे. शहरात सिमेंटचे रस्ते, उंच इमारती, टिनशेडची घरे आणि डांबरी रस्ते दिवसभर उष्णता शोषून घेतात. पावसाचे प्रमाण घटल्याने किंवा पाऊस उशिरा आल्यामुळे जमिनीतील ओलावा संपला आहे. कोरडी जमीन सूर्याच्या किरणांमुळे अधिक तापते. यामुळे स्थानिक वातावरण प्रचंड गरम होत आहे.


























































