
घोडबंदर रोडवरील ओवळा येथे ठाणे महापालिका ३० मीटरचा डीपी रोड तयार करणार आहे. त्यासाठी चाळींमध्ये राहणाऱ्या ६५ गोरगरीब रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या असून त्यापैकी ३२ घरे तोडण्यात आली आहेत. त्यांचे पालिकेच्या राखीव भूखंडावर कायमस्वरूपी पुनर्वसन करावे अशी मागणी आईनगर सोसायटी आणि आईनगर ट्रस्टने आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. त्यासाठी येथील रहिवासी गेल्या काही महिन्यांपासून पालिकेचे उंबरठे झिजवत असून त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
ओवळा येथील विविध चाळींमध्ये ६५ कुटुंबे १६ वर्षांपासून राहात आहेत. ते सर्व रहिवासी मोलमजुरी तसेच छोटीमोठी नोकरी करणारे असून त्यात काही दिव्यांग देखील आहेत. पालिकेने या सर्वांना नोटिसा बजावल्या आहेत. २१ ऑगस्ट रोजी पालिकेच्या पथकाने कारवाई करून ३२ कुटुंबांना बेघर केल्याचा आरोप आईनगर सोसायटीचे अध्यक्ष काशिनाथ भगत यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी वाऱ्यावर सोडले ओवळा येथील बेघर झालेल्या रहिवाशांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करा या मागणीसाठी आईनगर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदनदेखील दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तर ३५ अर्ज केले. मात्र त्याची कोणतीही दखल घेतली नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप सोसायटीचे अध्यक्ष काशिनाथ भगत यांनी केला आहे.
सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना निवेदन दिले असून ओवळा येथील पालिकेच्या भूखंडावर कायमस्वरूपी पुनर्वसन करावे अशी मागणी केली आहे. तोडण्यात आलेली घरे अनधिकृत असली तरी अनेक वर्षांपासून ओवळा येथे आम्ही राहात आहोत. पालिकेच्या भूखंडांवर करण्यात आलेले अतिक्रमण हटवून तेथे पुनर्वसन करावे, असा आग्रह रहिवाशांनी धरला आहे.


























































