
रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी, पत्रकार बाळ बोठेला मदत करणाऱ्या नऊ जणांची चौकशी पूर्ण झाली आहे. या चौकशीमध्ये अन्य काही नावे समोर आल्यामुळे इतरांची चौकशी केली जाणार आहे. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील तसेच, इतर दोन नामांकित व्यक्तींचाही समावेश आहे.
रेखा जरे खून खटल्यातील मुख्य आरोपी आरोपी बोठे याला अटक केल्यानंतर आता पोलिसांनी या संदर्भात तपास सुरु केला आहे. मागील आठवडय़ात चार जणांची चौकशी झाली होती. उर्वरित पाच जणांची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीमध्ये अन्य काही नावे पुढे आली आहेत. यामध्ये एक वैद्यकीय व्यावसायिक असल्याचे समजते. तसेच, अन्य दोन प्रतिष्ठत व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे.
बोठे हा तीन महिन्यापासून फरार होता. त्यावेळी तो कुठे राहिला, कसा राहिला याचा पोलिसांनी या शोध घेतलेला असून, त्याचाही तपास पूर्ण केला आहे. तसेच तो नगरच्या रेल्वेस्थानकावर आठ दिवस थांबला असल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलिसांकडे सुद्धा माहिती घेण्यात आली आहे. याची माहिती पुढील आठवडय़ात येण्याची शक्यता आहे. ज्या वेळेला तो फरार होता. त्या वेळेत तो कोणा कोणाच्या संपर्कात होता. तसेच, त्याच्या जवळचे कोण कोण आहेत त्यांचे जवाब घेण्यास सुरुवात केली होती. आता यात नवीन नावेही समोर आली असून, काही महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. त्यांना चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.
दरम्यान, बोठे याचे जप्त केलेले फोन फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. त्याचबरोबर इतर आरोपींकडून जप्त केलेल्या मोबाईलची माहितीही अद्याप येऊ शकली नाही.

























































