
महागाई कशी वाढत चालली आहे, ती सतत तुमच्या डोक्यात रहावी म्हणून मी तुमच्या लक्षात आणून देत आहे. मतदानासाठी बटण दाबताना ही महागाई लक्षात राहिली पाहिजे, अशा मिश्कील शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वाढत्या महागाईवर सत्ताधाऱ्यांना चिमटे काढले.
बारामती येथे ज्येष्ठ नागरिक निवास येथील वाढीव भोजन कक्ष व करमणूक कक्ष इमारतीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, येथील एका कक्षाचे बांधकाम 50 हजारांत पूर्वी झाले होते, मात्र त्याच्या नूतनीकरणासाठी 3 लाख रुपये खर्च आला. महागाई कशी वाढत चालली आहे हे तुमच्या लक्षात रहावे यासाठी मी सांगतो आहे. देशासमोर महागाई, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, असेही पवार म्हणाले. दरम्यान, देशाची लोकसंख्या वाढली आहे. लोकसंख्येच्या बाबतीत आपण चीनलादेखील मागे टाकले आहे. तरुणांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात ज्येष्ठांची संख्यादेखील वाढली आहे. घरामध्ये एकटय़ा राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना काही मेडिकल इमर्जन्सी आली तर अशा वेळी ज्येष्ठ नागरिक निवारा केंद्र उपयुक्त आहे, असेही पवार म्हणाले.
पवारांनी घेतली पत्नीची फिरकी
पवार यांनी यावेळी बोलताना लोकसंख्येचे प्रमाण व त्यातील तरुणांचा टक्का व ज्येष्ठांचा टक्का किती प्रमाणात आहे याची माहिती दिली. ‘सध्या देशात तरुणांची संख्या मोठी आहे. देशात 60 पेक्षा जास्त ज्येष्ठांची संख्या 10 टक्के आहे. देशात 13 कोटी 50 लाख लोक 60 वर्षांच्या पुढची आहेत. यामध्ये अजित पवारचासुद्धा नंबर लागतो आणि लवकरच सुनेत्राचासुद्धा लागणार आहे. यावर सुनेत्रा पवार यांनीही हसून दाद दिली, तर उपस्थितांमध्येही खसखस पिकली.
रोजचा अत्यंत व्यस्त दिनक्रम असणाऱ्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी येथील ज्येष्ठ नागरिक निवासात श्रमण करमणूक केंद्रात पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह कॅरम खेळण्याचा आनंद लुटला.
































































