अकरावी प्रवेशाचे नो टेन्शन; राखीव कोटय़ातील जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या होणार

अकरावी ऑनलाइन प्रवेशातील तीन सर्वसाधारण गुणवत्ता याद्यांनंतर यापुढे जाहीर होणाऱया विशेष गुणवत्ता यादीतील प्रवेश कोणत्याही आरक्षणाशिवाय पार पडणार असल्याची माहिती शिक्षण संचालनालयातील सूत्रांनी दिली. विशेष फेरीत केवळ विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेलाच प्राधान्य दिले जाणार असून राखीव कोटय़ातील जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या केल्या जाणार आहेत. या प्रवर्गातून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मेरिटनुसार प्रवेशाची संधी दिली जाणार आहे.

तीन गुणवत्ता याद्यानंतर एकटय़ा मुंबई विभागात एक लाखाहून अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. यातील बहुतांश जागा या राखीव कोटय़ातील आहेत. सर्वसाधारण गुणवत्ता याद्यांपर्यंत या जागांवर पात्र विद्यार्थ्यांचेच प्रवेश करण्याचा नियम आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांअभावी तिसऱया यादीपर्यंत यातील जागा रिक्त राहतात. मात्र प्रवेशाच्या तीन फेऱयांनंतर या जागा सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी खुल्या करता येत असल्याने या जागांवर विशेष प्रवेश फेरीत मोठय़ा प्रमाणावर प्रवेश होण्याची शक्यता आहे.

असे आहे आरक्षण

एससी, एसटी, व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी, एसबीसी, ईडब्ल्यूएस या सामाजिक आरक्षणा (62 टक्के) शिवाय महिला, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, बदली कर्मचारी, आजीमाजी सैनिक, खेळाडू, अनाथ मुले असे समांतर आरक्षण (45 टक्के) अकरावी प्रवेशासाठी लागू आहे. या जागांवर त्यात्या प्रवर्गातील पात्र विद्यार्थी मिळाल्यास त्या जागा रिक्त ठेवाव्या लागतात. मात्र विशेष फेरीत या जागांवर गुणवत्तेनुसार प्रवेशाची संधी देण्यात येते. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या या प्रवर्गासाठी उपलब्ध जागांच्या तुलनेत जास्त असल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळत नाही.

विशेष फेरीत संधी कुणाला

  • सर्वसाधारण फेरीत प्रवेश न मिळालेले विद्यार्थी
  • पहिल्या पसंतीचे कॉलेज अलॉट होऊनही प्रवेश नाकारलेल
  • मिळालेला प्रवेश रद्द केलेले
आपली प्रतिक्रिया द्या