>> डॉ. अंजुषा अनिल पाटील
महाराष्ट्र सरकारने स्थलांतरित मुलांना शिक्षणहक्क मिळवून देण्यासाठी अनेक योजना आणल्या. तरीही साखर कारखान्यात काम करणाऱया पालकांची मुले स्थलांतरित होतात व त्याच्या शिक्षणात खंड पडतो. या मुलांना शालेय प्रवाहात आणण्याचं काम टाटा ट्रस्टतर्फे पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर सहकारी कारखान्यामध्ये केले जात आहे. ‘शिक्षणकोंडी’ हे रोहन प्रकाशनने प्रकाशित केलेलं व परेश मनोहर आणि संतोष शेंडकर यांनी संपादित केलेलं पुस्तक नुकतंच वाचनात आलं.
ळण्याबागडण्याच्या वयामध्ये आईवडिलांच्या मदतीसाठी काम करणारी, शाळेचा गणवेष, दप्तर, डबा घेऊन शिकायला जावं अशी स्वप्नं बघणारी पोरं या पुस्तकात भेटतात. स्थलांतराचे चटके सोसावे लागणाऱया जगभरातल्या मुला-मुलींना शिक्षण घेण्यास प्रवृत्त करणारी कार्यकर्त्यांची टीम स्थलांतरित मुलांसाठी कार्यरत आहे. कार्यकर्त्यांच्या अनुभवाची 40 प्रकरणं या पुस्तकात आहेत. प्रत्येक प्रसंग लहान असून ते मनाचा ठाव घेतात. पुस्तक वाचत राहावंसं वाटतं.
6 ते 14 वयोगटाच्या मुलांना मोफत शिक्षण असूनही स्थलांतरित ऊसतोडणी कामगारांची मुलं शाळेत नियमित हवी असतील तर काय करायला हवे याचा ‘संशोधन प्रकल्प’ असं या कामाचं स्वरूप असून पुणे जिह्यातील सोमेश्वर सहकारी कारखाना निवडला गेला. तिथली 25 गावं प्रकल्पासाठी निवडून कारखाना तळ आणि इतर 25 गावं या प्रकल्पासाठी निवडून सर्व कामगारांचं सर्वेक्षण करून 0 ते 18 वयोगटातील मुलांचं वेगळं सर्वेक्षण केलं व या मुलांना जवळच्याच जि.प. शाळेत आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये दाखल करून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडली जात आहे.
या टीमबरोबर शिक्षण विभागाने एक शिक्षकही शिक्षक-संवादक म्हणून देण्यात आलेला आहे. कार्यकर्ते मुलांच्या मानसिकतेचा विचार करून शिक्षणाबरोबर त्यांचं आरोग्य, मनःस्वास्थ्य, घरातील वातावरण व भविष्यात उपयोगी पडणारे संस्कार या सर्वांचा विचार करून त्यांचे प्रबोधन केले जाते. मुलं जिथे राहतात त्या तळावर रोज पुस्तकवाचन, खेळ, व्यवहारज्ञान, गाणी, गोष्टी याद्वारे त्यांच्यावर शिक्षण संस्कार घडवून एक सहृदय, संवेदनशील माणूस घडवण्याचं काम करतात. दुसरीकडे स्थलांतरित होताना ‘शिक्षणहमी पत्र’ देण्याची व्यवस्थाही केली जाते.
सर्व मुलांना शिकायचं असतं; पण घरची आर्थिक परिस्थिती, अंधश्रद्धा, पारंपरिक मानसिकता, व्यसनाधिनता, मुलगा-मुलगी विषमता, हतबलता अशा अनेक कारणांमुळे ही मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहतात.
जेव्हा स्थानिक गावातली मुलं शाळेत जातात तयार होऊन तेव्हा ही बघत असतात त्यांच्या दप्तराकडे, चपलांकडे आणि अशा वेळी उसाची ओझी आणखीनच जड होऊन जातात. त्यांना दिसत असते आईबापाची जगण्याची लढाई आणि सहजपणे चिरडत असतात आपलंच बालपण आपल्याच हाताने…
‘फडातील वेणा’ या प्रकरणात एका महिलेच्या प्रसूतीची कथा विषण्ण करणारी आहे. ‘हौसाबाईची शाळेची हौस’ या भागात मुलांना शाळेत घेऊन येणारी हौसाबाई भेटते. ‘शिक्षणप्रेमी मुकादम’ या प्रकरणात मुकादम मुलांची हमीपत्रं घेण्यासाठी थांबतो. अशा सकारात्मक प्रसंगांमुळे आशा टीमच्या कार्यकर्त्यांना हुरूप येतो. ‘मॅडम मोठं काम करताय’ या प्रकरणात पालक-मुकादम-प्रकल्प टीम यांच्या मीटिंगमुळे पालक मुलांना शाळेत पाठवतात.
‘शिक्षणकोंडी’ हे रोहन प्रकाशनने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. मुलांचं भावविश्व, गावकरी, स्थलांतरित पालक, मुकादम, शिक्षण विभाग व वाचक यांच्यासाठी वाचनीय ठरणारे असे हे पुस्तक आहे.
शिक्षणकोंडी
संकलन संपादन – परेश जयश्री मनोहर,
संतोष शेंडकर
प्रकाशक – रोहन प्रकाशन
पृष्ठ – 108, मूल्य – रुपये 125/-




























































