रिक्षाचालकांना लुटणारी टोळी गजाआड 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवख्या रिक्षाचालकांना लुबाडणाऱ्या तिघांना मालवणी पोलिसांनी अटक केली. शौकतअली शहा, शिवकुमार यादव आणि युसूफ सिद्धीकी अशी त्या तिघांची नावे आहेत. त्या तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले ते तिघे काही महिन्यांपूर्वी मालवणी येथे भाडय़ाने राहण्यास आले. झटपट श्रीमंत होण्यासाठी ते फसवणूक करू लागले. ते तिघे सायंकाळच्या वेळेस अंधेरी, बोरिवली येथून मालाड येथे जाण्यासाठी रिक्षाचालकांना थांबवायचे. रिक्षा पकडून ते मालवणी येथे आल्यावर अक्साच्या धारावली गावात न्यायचे. त्यानंतर दोघेजण पैसे देण्याचा बहाणा करून एकजण रिक्षात ठेवलेला फोन आणि पैशाची बॅग घेऊन पळ काढत असायचे. अशाच प्रकारे एका रिक्षाचालकाची या टोळीने फसवणूक केली होती.

फसवणूकप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. वरिष्ठ निरीक्षक शेखर भालेराव याच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक हसन मुलाणी यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर त्या तिघांना मालवणी येथून अटक केली. कसून चौकशी केल्यावर त्या तिघांनी गुह्याची कबुली दिली.