पिस्तूलाचा धाक दाखवून कोथरुडमध्ये सोन्याच्या दुकानावर दरोडा, घटना सीसीटीव्हीत कैद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यातील कोथरूड या भागात पौड रोडवर असणाऱ्या ‘पेठे ज्वेलर्स’वर दरोडा टाकण्यात आला आहे. दोन भामट्यांनी भरदिवसा पिस्तूलाचा धाक दाखवून तब्बल सव्वा कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. रविवारी घटलेली ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोथरूडमध्ये पौड रोडवर आनंदनगर येथे ‘पेठे ज्वेलर्स’ हे सोने-चांदीचे सराफ दुकान आहे. या दुकानात दुपारच्या सुमारास तीन सेल्समन आणि एक कॅशिअर असे चौघे उपस्थित असताना 4 वाजून 8 मिनिटांनी दोन भामट्यांनी प्रवेश केला. काही कळण्याच्या आत त्यापैकी एका पिस्तूल काढत हवेत गोळीबार केला आणि कामगारांवर पिस्तूल ताणली. दुसऱ्याने पाठीवरील सॅक काढत कर्मचाऱ्यांनी सोन्याच्या दागिन्याचे बॉक्स काढून देण्यास सांगितले.

पिस्तूलाच्या धाकामुळे कामगारांनी शोकेसमधील दागिने काऊंटवर काढून ठेवले. दुसऱ्या भामट्याने सर्व दागिने सॅकमध्ये भरले. या दरम्यान कामगारांनी चालाखी करू नये म्हणून पिस्तूल असणाऱ्याने आणखी एक गोळी हवेत फायर केली. काही मिनिटातच दुकानातील सव्वा कोटी रुपयांची चोरी करून दोघे भामटे चांदणी चौकाच्या दिशने फरार झाले. या प्रकरणी पराग पेठे यांनी कोथरूड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस तसेच गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.