
सामना प्रतिनिधी । लंडन
ग्रासकोर्ट टेनिसचा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱया स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने यंदाच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत जपानच्या की निशिकोरीचा 4-6, 6-1, 6-4, 6-4 असा पराभव करीत विम्बल्डन स्पर्धेच्या एकेरीतील आपला शंभरावा विजय नोंदवला. एखाद्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत 100 विजय मिळवणारा फेडरर हा जगातला पहिला टेनिसपटू ठरला आहे. या विजयाने फेडररने विम्बल्डन एकेरीच्या उपांत्य फेरीत तेराव्यांदा प्रवेश करण्याचा पराक्रम केला आहे. उपांत्य लढतीत त्याची झुंज स्पेनच्या राफेल नदालशी होणार आहे .
आठ वेळा विम्बल्डन पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावणाऱया फेडररने 45 मिनिटांतच आपल्या जपानी प्रतिस्पर्ध्याचे आव्हान संपुष्ठात आणले. 37 वर्षीय फेडररची ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यफेरी गाठण्याची ही 45वी वेळ आहे. फेडरर आणि नदाल हे परंपरागत प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर 39 वेळा एकमेकांसमोर आले आहेत; पण विम्बल्डनमध्ये त्यांची एकमेकांशी गाठ तीनदाच पडली आहे.


























































