अजित गटाकडून आमदारांचे ब्लॅकमेलिंग, रोहित पवार यांचा गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिलेल्या आमदार, खासदारांना फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून पुन्हा एकदा प्रयत्न केले जाऊ लागले आहे. हे आमदार बधत नसल्याचे पाहून अजित पवार गटाने त्यांना ब्लॅकमेल करत आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी हा आरोप केला आहे. रोहित पवार यांनी म्हटले की, जर तुम्ही आम्हाला पाठिंबा दर्शवण्यासाठीच्या प्रतिज्ञापत्रावर सही करत नसाल तर तुमची कामे करणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सांगण्यात येत आहे.

प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात काही विषय असतात जे त्याला मार्गी लावायचे असतात. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार कदाचित अजित पवार गटाच्या दबावाला बळी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर बोलताना रोहित पवार यांनी म्हटले की आज कदाचित आकडा तुमच्या बाजूने दिसेल मात्र जेव्हा निवडणुका जवळ येतील तेव्हा त्यांना कळेल की त्यांच्या बाजूने किती लोकं आहे.

शरद पवारांसोबतचे आमदार अपात्र ठरवण्याची अजित गटाची मागणी

अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असलेले आमदार अपात्र घोषित करा अशी मागणी केली आहे. त्याबाबतची याचिका अजित गटाने विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. शरद पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. आपणच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावाही अजित गटाने केला आहे. अजित गटाने केलेल्या बंडखोरीनंतर त्यांची आणि त्यांच्यासोबत असलेल्या 9 आमदारांची शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी केली होती.