
देशातील इंधन दरवाढ आणि टंचाईच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र आणि आर्थिक धोरणांवर घणाघाती टीका केली आहे. अमेरिकेच्या दबावापुढे झुकल्यामुळे आज देशातील सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांना इंधन टंचाईचा जबर फटका सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत मोदी सरकारला आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला आहे.
आज चीन इराणकडून हवं तेवढं आणि स्वस्त दरात तेल खरेदी करत असताना हिंदुस्थानात मात्र तेलाची मारामार सुरू आहे. लोकांना शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरलाही डिझेल मिळत नाही. आपल्याला अमेरिका किंवा रशिया यासारख्या भौगोलिकदृष्ट्या दूरच्या देशांकडून आणि तेही महागड्या दरात तेल खरेदी करावं लागतंय, असे रोहित पवार म्हणाले.
आजपर्यंतच्या सर्वच सरकारांनी दाखवलेला कणखरपणा बाजूला ठेवून अमेरिकेसारख्या देशापुढं झुकलं तर त्याचा सामान्य माणसाला किती जबर फटका सहन करावा लागतो, हे यानिमित्ताने दिसत आहे. विशेष म्हणजे आपलं नाक दाबून अमेरिका नफेखोरी करतंय हे किती दुर्दैव आहे. इराणसोबत आपले पूर्वीपासून दृढ मैत्रीचे संबंध असतानाही आपण केवळ अमेरिकेपुढं झुकून या संबंधात बिब्बा घातला आणि याचा फटका मात्र देशातील सामान्य माणसाला सहन करावा लागतोय, अशी टीका रोहित पवार यांनी केली.
आज चीन – इराणकडून हवं तेवढं आणि स्वस्त दरात तेल खरेदी करत असताना भारतात मात्र तेलाची मारामार सुरूय. लोकांना शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरलाही डिझेल मिळत नाही. आपल्याला अमेरिका किंवा रशिया यासारख्या भौगोलिकदृष्ट्या दूरच्या देशांकडून आणि तेही महागड्या दरात तेल खरेदी करावं लागतंय.…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 30, 2026
आतातरी यातून धडा घेऊन सत्ताधाऱ्यांनी कोणत्या देशाची बाजू घ्यायची याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी केले.































































