रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन कसोटी रँकिंगच्या टॉप टेनमध्ये, इंग्लंडविरुद्धच्या कामगिरीचे फळ मिळाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा, कर्णधार विराट कोहली, फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांच्या उत्तम कामगिरीच्या जोरावर हिंदुस्थानने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दमदार पुनरागमन केले. त्यांच्या या दमदार कामगिरीचे फळ त्यांना आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये बढतीने मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी रँकिंगमध्ये हिंदुस्थानचा सलामीवीर रोहित शर्मा याला आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत टॉप टेनमध्ये स्थान मिळाले आहे. त्याला सहा स्थानांनी बढती मिळून तो आठव्या स्थानी विराजमान झाला. यादीत वरील 7 फलंदाजांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नसून विराट पाचव्या स्थानी कायम आहे. चेतेश्वर पुजारा मात्र दोन स्थानांनी खाली घसरून दहाव्या स्थानी पोहोचला आहे.

आयसीसी गोलंदाजांच्या यादीत टीम इंडियाचा फिरकीवीर रविचंद्रन अश्विन याला 4 स्थानांची बढती मिळाली असून तो तिसऱया स्थानी विराजमान झाला आहे. यादीत जसप्रीत बुमराहची एका स्थानाने घसरण झाली असून तो नवव्या स्थानी पोहोचला आहे. याशिवाय इंग्लंडचे दोन अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स ऍण्डरसन यांचीही अनुक्रमे एक आणि तीन स्थानांनी घसरण झाल्याचे दिसत आहे. ताज्या यादीनुसार इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऍण्डरसन सहाव्या आणि ब्रॉड सातव्या क्रमांकावर आहे. दरम्यान, हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यातील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अहमदाबादमध्ये 4 ते 8 मार्च या कालावधीत होणार आहे. त्यात चमकदार कामगिरी करून आयसीसी गुणांकनात मोठी झेप घेण्यासाठी हिंदुस्थानचे स्टार क्रिकेटपटू प्रयत्नशील आहेत.