दमदार सुरुवातीचा फायदा घेता आला नाही, फलंदाजांनी घात केला! रोहित शर्माचे पराभवानंतर उद्गार

आयपीएलच्या सलामीच्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्जकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने फलंदाजांवर याचे खापर फोडले. तो यावेळी म्हणाला, मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली होती. 90 धावांपर्यंत दोनच फलंदाज बाद झाले होते. तसेच यादरम्यान फक्त 10 षटकांचाच खेळ झाला होता. अशा परिस्थितीतून आम्हाला मोठी झेप घेणे अपेक्षित होते. पण आम्हाला 9 बाद 162 धावाच करता आल्या. एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. फलंदाजांच्या अपयशामुळे आम्ही पराभूत झालो. आता या लढतीत झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न आम्ही करू, असेही रोहित शर्मा पुढे म्हणाला.

दृष्टिक्षेपात

  • मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नई सुपरकिंग्जला           सलग पाच लढतीतील पराभवानंतर विजय मिळवता आला आहे.
  • मुंबई इंडियन्सला 2012 सालानंतर सलामीच्या लढतीत अद्याप विजय मिळवता आलेला नाही. सलग आठव्या वर्षी त्यांना पराभवाचा चेहरा पाहावा लागलाय.
  • महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्जने 100व्या विजयाला गवसणी घातली. त्याने 161 लढतीत संघाचे नेतृत्व केले आहे. यामधील 60 लढतींमध्ये त्यांना हार सहन करावी लागली.

300 लढतींचा अनुभव कामाला आला धोनी

महेंद्रसिंग धोनीने सलामीच्या लढतीत विजय मिळवल्यानंतर 300 वन डे लढतींचा अनुभव यावेळी कामाला आला, असे म्हटले. आयपीएलसारख्या स्पर्धेत अनुभवी व युवा खेळाडूंचे मिश्रण संघामध्ये असल्यास फायदा होतो. कारण युवा खेळाडूंना अनुभवी खेळाडूंकडून खूप काही शिकायला मिळते, असेही तो सांगतो.

गतविजेत्यांचा पराभव

गतविजेता आणि चार वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सला यंदाच्या मोसमात पहिल्याच लढतीत चेन्नई सुपरकिंग्जकडून पाच गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. मुंबई इंडियन्सकडून मिळालेल्या 163 धावांचे आव्हान चेन्नई सुपरकिंग्जने पाच गडी गमावून ओलांडले. फाफ डय़ुप्लेसिस (नाबाद 58 धावा) व अंबाती रायुडू (71 धावा) या जोडीने तिसऱया विकेटसाठी 115 धावांची भागीदारी रचत संघाच्या विजयाची भक्कम पायाभरणी केली. तीन षटकार व सहा चौकारांची आतषबाजी करणाऱया अंबाती रायुडूची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या