मला वर्ल्ड कप जिंकायचाय! दक्षिण आफ्रिकेतील वर्ल्ड कपपर्यंत खेळण्याची हिटमॅनची इच्छा

गेल्या वर्षी चांगला खेळ करूनही हिंदुस्थानचे जगज्जेतेपदाचे स्वप्न भंगले होते. मात्र ‘हिटमॅन’ रोहित शर्माने आपल्याला दक्षिण आफ्रिकेत होणाऱया आयसीसी वन डे वर्ल्ड कपमध्ये खेळायचे असून तो वर्ल्ड कप जिंकण्याची मनापासून इच्छा असल्याची भावना व्यक्त केलीय.

एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत रोहित शर्मा वर्ल्ड कपबाबत भरभरून बोलला. ‘क्रिकेटचा खरा वर्ल्ड कप हा वन डे वर्ल्ड कपच आहे. आम्ही त्याच वर्ल्ड कपकडे पाहून मोठे झालोय. त्यामुळे आपल्या क्रिकेट कारकीर्दीत हिंदुस्थानी संघासाठी तो वर्ल्ड कप जिंकायचा असल्याचे सांगताना आपला अद्याप निवृत्तीचा कोणताही विचार नाही. मला अजून काही वर्षे क्रिकेट खेळायचे आहे आणि 2027 चा वर्ल्ड कपही जिंकायचा आहे.’ रोहित 2007 साली टी-20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य होता, पण वन डे वर्ल्ड कपपेक्षा कोणताही वर्ल्ड कप मोठा नाही, असे त्याचे स्पष्ट मत आहे.

गेल्या वर्षी अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यातील पराभवामुळे आपण अक्षरशः खचलो होतो. त्या पराभवानंतर अनेकांच्या मनात अनेक विचार आले असतील, पण मला अजून क्रिकेट खेळायचे आहे. मी निवृत्तीचा कोणताही विचार केलेला नाही. पण आयुष्य कधी कोणत्या वळणावर असेल, हे सांगता येत नाही. मी याक्षणी चांगला खेळतोय आणि काही वर्षे क्रिकेट खेळू इच्छितो. मला वर्ल्ड कप जिंकायचा आहे. लॉर्ड्सवर 2025 साली जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना रंगणार आहे आणि आशा आहे, तो सामना आम्ही खेळणार, असा विश्वासही रोहितने व्यक्त केला.

गेल्या वर्षी वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात हरल्यानंतर मी अनेक दिवस मौन होतो. आम्ही चांगले खेळलो तरीही हरलो. पराभवानंतर मी एका गोष्टीचा खूप विचार करत होतो. आम्ही फायनलमध्ये का हरलो, याचे कारण मी शोधत होतो आणि एकही कारण समोर आले नाही. आमच्या अभियानात एक दिवस वाईट येणार होता आणि तोच हा दिवस होता. आम्ही अफलातून खेळलो. आत्मविश्वासही होता, परंतु एक दिवस आमचा खराब गेला आणि ऑस्ट्रेलियाचा तो दिवस चांगला गेला. आम्ही फायनलला खराब नाही, चांगले क्रिकेट खेळल्याचेही रोहितने आवर्जून सांगितले.