रोखठोक – श्री गणपतीची लोकशाही!

संसदेच्या विशेष अधिवेशनाची सुरुवात पंतप्रधान मोदी गणेश पूजनाने करतील. गणपती हे लोकशाहीचे दैवत हे बहुधा मोदी विसरलेले दिसतात. प्राचीन भारतात ‘गणराज्य’ व्यवस्था होती. ती एक संघराज्य पद्धती होती. त्या संघराज्यांचा ‘सेनापती’ गणपती होते. लोकशाही तेथे नांदत होती. आता संघराज्य पद्धती मोडून काढली जात आहे. गणपती उत्सवात यावर चर्चा व्हायला हवी!

दि ल्लीतील नव्या संसद भवनाचा उद्घाटन सोहळा गणेश पूजनाने होईल. ऐन गणपतीत पंतप्रधान मोदी यांनी संसदेत राजकीय गणेश उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. संसदेचे विशेष अधिवेशन त्यासाठीच आहे.  लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी लोकांचे प्रश्न कमी व सार्वजनिक, धार्मिक उत्सव जास्त करीत आहेत. संसदेत गणेश पूजन झाले तरी 2024 साली भाजपची संसदेत पुनर्स्थापना होणार नाही हे श्री गणपतीच्याच मनात आहे. दिल्लीत ‘जी-20’चा उत्सव साजरा झाला. काही जागतिक नेत्यांचे मत असे पडले की, दिल्लीत इतक्या मोठय़ा नेत्यांना बोलावून भारताच्या पंतप्रधानांनी काय साधले? आमचा वेळ वाया घालवला. सगळ्यात जास्त वेळ ‘फोटोबाजी’तच घालवला. सर्व जागतिक नेत्यांना घेऊन पंतप्रधान मोदी राजघाटावर गांधीचरणी पोहोचले. 52 मिनिटांच्या या कार्पामातील 47 मिनिटे फोटोबाजीतच गेली. वीस देशांचे राष्ट्रप्रमुख दिल्लीत आले, पण श्री. मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी ‘डिनर’ पार्टी आयोजित केली ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासाठी. त्यामुळे इतर 19 जण त्या दिवशी आपापल्या हॉटेलात रिकामेच बसले होते अशी चर्चा दिल्लीच्या वर्तुळात आहे. ‘गणपती आला आणि नाचून गेला’ असे एक पारंपरिक गीत आहे. त्याप्रमाणे देशोदेशीचे हे राजे-महाराजे दिल्लीत येऊन गेले. या सगळ्यांच्या येण्यामुळे आपला देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची महासत्ता झाला असेल तर आनंदच आहे.

मुक्तपणा आहे काय? 

गणपती हे लोकशाहीचे दैवत आहे हे बहुधा श्री. मोदी यांच्या स्मरणात नसावे. इंग्रजांची हुकूमशाही उलथवून टाकण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवांची योजना आखली. लोकांनी एकत्र जमावे. देशाविषयी विचार करावा, निर्णय घ्यावा. लोकांना गुलामी व जुलमाबाबत मुक्तपणे बोलता यावे म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. त्याच गणपतींच्या मेळ्यांतून तेव्हा वीर चापेकर बंधू निर्माण झाले. त्याच गणेशाचे पूजन पंतप्रधान मोदी नव्या संसद भवनात करणार आहेत, पण या वास्तूच्या पहिल्या उद्घाटनाला त्यांनी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलावले नाही. कारण त्या आदिवासी आहेत व आज भाजपचे लोक सनातन धर्मावर बोलत आहेत. गणपती हे लोकशाही व्यवस्थेचे प्रतीक आहे. आज लोकशाही व्यवस्थेत देशाचे राष्ट्रपती महत्त्वाचे आहेत. त्याच प्रकारे प्राचीन भारतात गणव्यवस्था होती आणि त्या व्यवस्थेचा प्रमुख गणपती होता. जो राजा किंवा सम्राट होता त्यास गणपती (गण) म्हणजे प्रजापती बोलत असत. ती एक संघराज्य पद्धती (Federal Structure) होती व लोकशाही पद्धतीने काम चालत असावे. आज संसदेत गणेश पूजन होईल, पण संघराज्य व्यवस्थेवर रोज हल्ला होत आहे, त्याचे काय? संसदेच्या विशेष अधिवेशनात निवडणूक आयोगाच्या नेमणुकीचे सर्वाधिकार सरकार ताब्यात घेईल, असे एक हुकूमशाही पद्धतीचे विधेयक आणले आहे. ‘एक राष्ट्र एक निवडणूक’ हा विचार गणपतीच्या संघराज्य संकल्पनेच्या विरोधात आहे. ऐन गणपतीत लोकशाहीचा हा असा खेळखंडोबा होताना आपण सगळेच थंडपणे पाहू.

चंद्रावर काय? 

गणपती हे प्रतिभावंतांचे दैवत. महाराष्ट्रात गणपती उत्सव सगळ्यात जोरदारपणे साजरा होतो तो लोकमान्य टिळकांमुळे. गणपती विज्ञानाचाही भोक्ता. त्यामुळे चंद्रावर आपले ‘यान’ उतरले ते गणपतीच्या भूमीवर. चंद्रावर उतरलेल्या यानात माणूस नव्हता, पण यानातील कॅमेऱ्याने चंद्र खरा कसा आहे ते भारतासह जगाला दाखवले. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती रामाफोसा हे दिल्लीत ‘जी-20’साठी आले. ते म्हणाले, “भारताचे चांद्रयान चंद्रावर उतरत असताना मी तो प्रसंग पाहत होतो. डोळ्याची पातीही लवू न देता पाहत होतो.” संपूर्ण भारत देशच तो अनुभव घेत असताना शेवटच्या क्षणी चंद्रावरचे आपले यान टीव्हीच्या पडद्यावरून अदृश्य झाले व ती जागा महान वैज्ञानिक श्री. नरेंद्र मोदी यांनी घेतली. त्यामुळे स्वर्गस्थ गणपतीनेही चंद्रावरच्या स्वर्गात कपाळावर हात मारून घेतला असेल. लोकांना त्याक्षणी खरा चंद्र पाहायचा होता, पण घडले भलतेच. तरीही आपण स्वर्गाचे खरे रूप म्हणून चंद्र पाहिला. आपल्या कल्पनेतला चंद्र तो नव्हता. प्रभू श्रीरामाला खेळण्यासाठी चंद्रकोर हवी होती. तो चंद्र त्या अयोध्येच्या राजकुमारालाही मिळाला नाही. तो चंद्र-माधवीचा खेळ हा नव्हता. चंद्र मोहक नव्हता, तो ओबडधोबड होता. डागाळलेला, गुदमरलेला, कोंदट होता. चंद्र असा का? याचे उत्तर पुन्हा गणपतीच्या पुराणकथेत आहे. एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना ते घसरले, गडबडले. त्यांना पाहून चंद्र चेष्टेने हसू लागला. गणपती चिडला. चिडलेल्या गणपतीने चंद्राला शाप दिला की, “आजपासून तुझे कोणी तोंडदेखील पाहणार नाही. जो कोणी तुझे तोंड पाहील त्याच्यावर खोटा आळ येईल.” पुढे हा शाप एक दिवसावर आला. चंद्राच्या ‘डागा’चे हे कारण आहे. चांद्रयानाने सर्व खड्डेच दाखवले. चंद्रावर स्वर्ग नाही. स्वर्ग मोदींचा आशीर्वाद लाभलेल्या मूठभर लोकांच्या महालात आहे. वेगवेगळ्या धर्मामध्ये स्वर्गाच्या कथा आणि कल्पना आहेत. ज्या ज्या गोष्टींना धर्म इथे विरोध करतो ते सगळे काही स्वर्गात आहे. तेथे उत्तम मदिरेच्या जणू नद्या वाहत आहेत. अप्सरांची नृत्य मैफल आहे. श्रीमंती आहे. महान ऋषी खाली तप करून वर स्वर्गसुखाला पोहोचले आहेत. पृथ्वीवरचे अनेक महान लोक ‘स्वर्गीय’ होऊन या आनंदात आहेत. प्रत्येकाचा स्वर्ग वेगळा आहे, पण ‘यान’ चंद्रावर म्हणजे स्वर्गात पोहोचले तेव्हा यापैकी काहीच आढळले नाही व आता स्वर्गातले गणपती भारतात अवतरत आहेत.

स्वर्ग आणि नरक 

चंद्रावर स्वर्ग नाही. नरकही नाही. सर्व काही इथेच आहे. भारतात लोकशाहीचा नरक झालेला आपण पाहत आहोत. एका सज्जन व्यक्तीने ओशोला विचारले, “असे किती नरक असतात?” ओशो म्हणाले, “जितके नरक उभारायचे तितके असू शकतात. कुणाचं एका नरकाने भागतं. कुणाला दोन पुरत नाहीत. कुणाला तीन कमी पडतात.

हे व्यक्तीगणिक बदलत असतात. तुमचा अहंकार, तुमचा हव्यास जेवढा मोठा तेवढे नरक उभारणे भाग पडते. नरक म्हणजे काय? त्या अहंकार आणि हव्यासाच्या पायऱ्या आहेत.” सध्या भारतात याच पायऱ्यांवर आपण सगळे उभे आहोत. चंद्रावर स्वर्ग नाही. म्हणून भक्तांनी उभारलेल्या मंडपातील स्वर्गात गणपती महाराज अवतरणार आहेत. गणपतीच्या लोकशाहीचा पृथ्वीवर नरक झाला आहे. तेवढा दुरुस्त करून त्यांनी जावे इतकेच!

Twitter – @rautsanjay61
Email –  [email protected]