रोखठोक – लताचे गाणे; स्मारकाचे बहाणे

लता मंगेशकर अनंतात विलीन झाल्या; पण त्यांचे सूर, त्यांचे गाणे कणाकणात, रोमारोमात राहील. हेच त्यांचे खरे स्मारक. लता मंगेशकरांच्या स्मारकाचा वाद घालणारे त्यांच्या मोठेपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत!

लता मंगेशकर अनंतात विलीन झाल्या आहेत. शिवतीर्थावर त्यांच्या पार्थिवास अग्नी दिला ते योग्यच झाले; पण जेथे अग्नी दिला तिथेच लता मंगेशकरांचे स्मारक करा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली. आधी बाळासाहेबांच्या स्मारकावरून व आता लता मंगेशकरांच्या स्मारकावरून वाद करणे हे रोगट मानसिकतेचे लक्षण आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला, मराठी माणसाला आणि हिंदूंना जे दिले त्याची भरपाई एका स्मारकाने होणार नाही. लता मंगेशकरांनी तर सात दशके सूरस्वरांच्या माध्यमातून संपूर्ण जगाला वेदना विसरायला लावल्या. या दोन्ही व्यक्ती जिवंतपणीच दंतकथा बनल्या. त्यांची स्मारके झाली काय, नाही झाली काय, फरक पडत नाही. दिल्लीतील मोदी सरकारने महात्मा गांधी, पंडित नेहरूंना झाकण्याचा अतोनात प्रयत्न चालवला आहे. पण अशी झाकाझाकी करून गांधी-नेहरूंचे विस्मरण कोणाला होणार आहे काय? लता मंगेशकरांच्या स्मारकाचा वाद घालणाऱयांनी एक लक्षात घेतले पाहिजे, त्यांची विधाने महाराष्ट्राची मान शरमेने झुकावी अशी आहेत. शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचे अंत्यसंस्कार झाले. कारण शिवाजी पार्कशी बाळासाहेबांचे नाते होते. याच मैदानातून त्यांनी महाराष्ट्र अस्मितेचे रणशिंग फुंकले. चाळीस लाख लोक बाळासाहेबांना अखेरची मानवंदना देण्यासाठी आले. बाळासाहेबांच्या अंत्यसंस्कारासाठी शिवतीर्थ हाच एकमेव पर्याय होता. लता मंगेशकर हा अपवाद. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले, ‘‘शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच राहायला हवे. त्याची स्मशानभूमी होऊ नये.’’ प्रकाश आंबेडकर चुकीचे बोलले नाहीत. खुद्द हृदयनाथ मंगेशकर यांनीही लता मंगेशकर यांचे स्मारक शिवाजी पार्कवर उभारावे अशी आमची इच्छा नाही. त्यावरून राजकारण थांबवा, अशी अत्यंत योग्य आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. ते मंगेशकर कुटुंबीयांचे मोठेपण आहे.

चांदण्यांचे सूर…

लता मंगेशकरांचे मोठेपण सांगण्याची गरज राहिलेली नाही. ते स्वयंसिद्ध आहे. चांदण्यासारखे ते सुरांतून अखंड झिरपत राहिले आहे. सध्याचे युग ग्रामोफोनचे आणि कॅसेटचे नाही. जग पुढे गेले आहे. कोणत्याही यंत्राच्या मदतीशिवाय त्यांचे सूर सतत कानी पडत आहेत. प. बंगालात पुढचे पंधरा दिवस सार्वजनिक ठिकाणी लतादीदींची गाणी वाजविली जातील, हा ममता सरकारचा निर्णय आहे. अशा सुरांना, सुरांच्या अप्सरेला वेगळय़ा स्मारकाची गरज काय? मीराबाईंची भजने आणि पदे अनेकांनी गायली. ‘म्हारो रे गिरीधर गोपाल’ हे कुमार गंधर्वांपासून लता मंगेशकरांपर्यंत सगळ्यांनी गायले. परंतु गायकीच्या अंगाने गायलेल्या मीराबाईंच्या भजनांच्या तुलनेत लतादीदींनी भावाच्या अंगाने गायलेली तीच भजने मन हेलावून टाकतात. लतादीदींनी जणू आपले सारे जीवनच व्यापून टाकले. गीतेच्या अध्यायापासून ज्ञानेश्वरांच्या पसायदानापर्यंत सर्वकाही आपण लताबाईंच्या आवाजातच ऐकत राहिलो. हा सारा त्यांच्या कलाजीवनातील भव्यदिव्य अशा ऐश्वर्याचा भाग आहे. हे ऐश्वर्य अपार कष्टाच्या आणि प्रदीर्घ परिश्रमाच्या पायावर उभे राहिले. म्हणून त्यांनी सदैव ऋण मानले ते पित्याचे. 1942मध्ये वयाच्या फक्त 42व्या वर्षी निष्कांचन अवस्थेत निधन पावलेल्या मराठी रंगभूमीवरील एका तपस्वी कलावंताच्या तंबोऱ्याला दीनानाथांनी ‘साधुपुरुष’ म्हटले आणि तो तंबोरा आपल्या लेकीसाठी ठेवून ते गेले. मुलीने निष्ठा आणि तपश्चर्या याचे परिपूर्ण योगदान या तंबोऱयास दिले. पिता निष्कांचन अवस्थेत गेला, पण त्याची लेक वैभवाच्या शिखरावर गेली. तिने यशाच्या सर्व पायऱ्या सर केल्या. लता मंगेशकर ही सुवर्ण मोहोरांच्या सुरांची खाण शेवटपर्यंत भरलेली राहिली. ते वैभव देशाने शिवतीर्थावर पाहिले तेव्हा पित्याचा म्हणजे दीनानाथांचा आत्माही प्रसन्न झाला असेल.

अमर ज्योत!

लता मंगेशकरांचे स्मारक करणार म्हणजे नक्की काय करणार? विद्यापीठाची स्थापना त्यांच्या नावाने करणे, संगीतातील पुरस्कार त्यांच्या नावाने देणे, एखादे म्युझियम उभारणे हे काही लता मंगेशकरांचे स्मारक होऊ शकत नाही. जोपर्यंत गाणारे गळे, ऐकणारे कान आणि अतृप्त मने आहेत तोपर्यंत लता मंगेशकरांचे नाव अमर आहे. अमर जवान ज्योतीप्रमाणे लता सुरांची अमर ज्योत उभारता येईल काय? लतादीदींच्या आवाजाला श्रीकृष्णाच्या बासरीची उपमा यापूर्वी अनेक मान्यवरांनी दिलेली आहे; परंतु मला आठवते ते व्यासांनी द्रौपदीच्या आवाजाचे केलेले वर्णन… श्रीमती दुर्गा भागवतांच्या ‘व्यास पर्वा’त तो उल्लेख आहे. ‘वीणेवर मधुर आलापात गांधाराची सुंदर मुर्च्छना लागावी असा द्रौपदीचा स्वर होता,’ असे वर्णन व्यासांनी केले आहे. तो स्वर ऐकण्याची संधी ज्यांच्यामुळे या युगात आपल्याला लाभली त्या लता मंगेशकरांचे सुरांचे स्मारक मनुष्य कसे काय उभारणार? लता मंगेशकर हिंदुत्वाच्या पुरस्कर्त्या होत्या. वीर सावरकरांच्या भक्त होत्या. कमालीच्या महाराष्ट्र अभिमानी होत्या. ‘मराठी’ असल्याचा त्यांना गर्व होता. त्यांचे स्मारकही अभिमान बाळगावा असेच व्हावे!

देवाघरचे गाणे

मंगेशकरांचे गाणे हे देवाघरचे देणे आहे. त्यांचे सूर ईश्वराचे वरदान होते. देवाचे म्हणजे ईश्वराचे स्मारक नाही. पुतळे आणि स्मारकांच्या पलीकडे काही व्यक्तिमत्त्वे जन्मास आली. त्यात एक लता मंगेशकर आहेत. अंतराळात आणि पृथ्वीवर त्यांच्या आवाजाची मोहिनी सदैव राहील. हिरमुसलेले मन त्यांच्या गाण्याने आनंदी होईल. आनंदी मन पाखराप्रमाणे उडेल. नद्या, समुद्र, त्यांचे सूर खेळवीत वाहत राहतील. कुणी त्यांच्या गाण्याची शीळ घालेल, कुणी नाचतील, आनंद साजरा करतील. दगड-भिंतीच्या निर्जीव स्मारकात हे शक्य आहे का?

लता मंगेशकरांच्या नावाने महाराष्ट्र सरकारने मेमोरियल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची संगीत अकादमी उभारण्याची घोषणा केली आहे. ठीक आहे. पुण्याच्या युवराज शहा यांनी एक चांगली संकल्पना मांडली ती देतो व विषय संपवतो. शहा सांगतात, मुंबईच्या समुद्र काठावर, सी लिंकच्या बाजूच्या खडकावर ‘व्हॉईस ऑफ इंडिया’ असा लता मंगेशकरांचा गात असतानाचा भव्य पुतळा उभा करा. तिथे त्यांची गाणी सदैव कानावर येऊ द्या…

Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]