रोखठोक – नेहरू वंशाचा ‘गांधी’ , 2024 च्या विजयाचे रणशिंग

राहुल गांधी पुन्हा संसदेत पोहोचले व अविश्वास ठरावाच्या चर्चेत त्यांनी जोरदार हल्ले केले. 9 ऑगस्टच्या क्रांतिदिनी नेहरू वंशातील एक ‘गांधी’ मोदी-शहांच्या मनमानी सत्तालोलुपतेविरोधात उभा राहिलेला देशाने पाहिला. श्री. मोदी यांना 2024 ची निवडणूक सोपी राहिलेली नाही.

पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या मुठीतून सत्तेची वाळू सटकत आहे. 2024 पर्यंत त्यांची मूठ रिकामी झालेली असेल हे आता स्पष्ट झाले आहे. देशाचे मोठेपण कशात असते ते देशाची लोकसंख्या, उंच इमारती, महागड्या गाडय़ा यावर ठरत नसते. ते राज्यकर्त्यांचे चारित्र्य व स्वातंत्र्याविषयी त्यांच्या मनात किती आदराचे स्थान आहे यावर ठरत असते. आज ते मोठेपण राहिलेले नाही. श्री. राहुल गांधी यांना भारतीय जनता पक्षाने संसदेतून काढले. त्यासाठी गुजरातच्या भूमीवरील न्याय यंत्रणा व कायद्याचा गैरवापर केला. तेच राहुल गांधी सरकारवरील अविश्वास ठरावाच्या वेळी संसदेत पोहोचले. एखाद्या वीराप्रमाणे त्यांचे स्वागत झाले. अविश्वास ठरावावर ते खणखणीत बोलले. तेव्हा भाजप सदस्यांनी फक्त गोंधळ घालण्याचेच काम केले. राहुल गांधी हे आदल्या दिवशी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात पोहोचले. सोबत सोनिया गांधी होत्या. मध्यवर्ती सभागृहात बसलेले भाजपचे सदस्य तेव्हा पळून गेले. राहुल गांधी जवळ आले व त्यांनी हस्तांदोलन केले तर ‘वर’पर्यंत वृत्त जाईल व नोकरी गमवावी लागेल हे भय आज दिल्लीत सर्वत्र आहे.

गांधींचे भाषण

राहुल गांधी यांनी अविश्वास ठरावावर लोकसभेत भाषण केले. ते संपूर्ण देशाने पाहिले. ‘अध्यक्ष महोदय, भाजपातील माझे मित्र तणावाखाली आहेत, पण त्यांनी ‘टेन्शन’ घेऊ नये. आज मी त्यांच्या प्रिय अदानींवर बोलणार नाही.’ असे सुरुवातीला बोलून गांधी यांनी भाजपची दांडीच उडवली. पुढील तासभर गांधी गडगडत राहिले व बरसत राहिले. 9 आागस्ट हा क्रांतिदिनाचा, ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या महात्मा गांधीकृत घोषणेचा दिवस. त्याच दिवशी नेहरू वंशातील एका गांधीने मोदी सरकारला ‘चले जाव’चा संदेश भारतीय संसदेत दिला. देशातले वातावरण आज तसेच आहे. ‘चले जाव’ आंदोलनाशी, स्वातंत्र्य लढय़ाशी काडीमात्र संबंध नसलेले लोक आज सत्तेवर आहेत व ते राहुल गांधींविरोधात ‘चले जाव’च्या घोषणा देत होते. मुंबईतील आागस्ट क्रांती मैदानातून गांधींनी ‘भारत छोडो’चा आदेश 9 ऑगस्ट 1942 ला दिला. त्या क्रांतिस्तंभावर फुले वाहण्यासाठी गांधींचे पणतू तुषार गांधी पोहोचले. त्यांना पोलिसांनी रोखले; कारण मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तेथे येणार होते व त्यांना सगळ्यात आधी तेथे फुले वाहायची होती. ज्यांनी सारी हयात गांधींचा द्वेष केला ते सर्व लोक ‘भारत छोडो’ Quit India चे नारे देत होते. श्री. राहुल गांधी विचलित न होता आपले भाषण करीत राहिले. राहुल गांधी यांना उत्तर देण्यासाठी तावातावाने स्मृती इराणी उभ्या राहिल्या; पण त्यांच्याकडे एक मिश्किल कटाक्ष टाकत राहुल गांधी सभागृहाबाहेर पडले. राहुल गांधींचा पराभव करून 2019 साली स्मृती इराणी निवडून आल्या, पण 2024 साली अमेठीची जनता चूक सुधारेल. श्रीमती प्रियंका गांधी यांनी वाराणसीतून निवडणूक लढवावी असे अनेकांचे आज मत आहे. प्रियंका गांधी यांच्याशी मोदी यांना मुकाबला करावा लागेल व निकाल काय लागेल ते कोणीच सांगू शकणार नाही. श्री. मोदी हे गुजरात व वाराणसी अशा दोन मतदारसंघांतून निवडणुका लढवतील, पण वाराणसी त्यांच्यासाठी सोपे राहणार नाही. देशाचे वातावरण आणि वारे पूर्ण बदलत आहेत.

महाराष्ट्र सदनात मोदी

पंतप्रधान मोदी हे सध्या दिल्लीत राज्याराज्यांतील ‘एनडीए’ खासदारांच्या बैठका घेत आहेत. एका बैठकीत ते म्हणाले, ‘आता फक्त माझ्या नावावर मते मागू नका. तुमच्या कामावर मते मिळवा.’ याचा अर्थ असा की, फक्त मोदी नावावर मते मिळणार नाहीत हे त्यांनी स्वीकारले आहे. महाराष्ट्र सदनात त्यांनी महाराष्ट्रातील ‘एनडीए’ खासदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे फोडलेले खासदार उपस्थित होते. त्यांच्यासमोर मोदी म्हणाले, ‘शिवसेनेशी युती आम्ही तोडली नाही. त्यांनीच तोडली.’ ‘सामना’ माझ्यावर टीका करतो, असे दु:ख त्यांनी व्यक्त केले. मोदी यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारावर हे विधान केले. शिवसेना-भाजप युतीचा ‘मित्रकाळ’ 25 वर्षांचा होता व त्या मित्रकाळात मोदी-शहा कोठेच नव्हते. 2014 सालात गुजरातची ही जोडी दिल्लीच्या राजकारणात अवतरली व त्यांनी ‘मित्रकाळ’ युती तोडली. मोदी 2019 चा दाखला देतात, पण मुळात ‘युती’ 2014 सालात भाजपने तोडली. विधानसभेच्या एका जागेवरून भाजपने युती तोडली. एकनाथ खडसे तेव्हा भाजपात होते व युती तोडत आहोत, असे उद्धव ठाकरे यांना अधिकृतपणे सांगण्याची जबाबदारी पक्षाने श्री. खडसेंवर सोपवली. खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून ‘युती तोडत आहोत’ असे सांगितले. श्री. मोदी यांना हे माहीत नसावे? ते कोणाला चुकीची माहिती देत आहेत? 2019 साली दिलेला शब्द पाळला नाही म्हणून दुसऱयांदा युती तुटली. एकनाथ शिंदे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्यास तेव्हा भाजपने नकार दिला म्हणून युती तुटली. आता त्याच शिंदेंना भाजपने मुख्यमंत्री केले. मोदी यांनी या घडामोडींवर भाष्य केले पाहिजे व खरे बोलायला हवे.

आरोप कोणी केले?

‘सामना’ माझ्यावर सातत्याने टीका करतो, असा नाराजीचा सूर पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्र सदनात काढला. तो तितकासा बरोबर नाही. श्री. फडणवीस वगैरे लोक नेहमी सांगतात, “आम्ही ‘सामना’ वाचत नाही.” पण त्यांचे सर्वोच्च बास ‘सामना’ची दखल घेतात व त्यावर भाष्य करतात हे चांगल्या नेत्याचे लक्षण. टीकाकारांचे विचार समजून घेतले पाहिजेत. हीच खरी लोकशाही. मोदी यांच्यावर कधीच व्यक्तिगत किंवा खालच्या पातळीवरची टीका ‘सामना’ने केली नाही. भाजपचे ‘नागडे पोपटलाल’ शिवसेना नेत्यांवर करतात तसे कमरेखालचे वार व खोटे आरोप केले नाहीत. मोदी मंत्रिमंडळातील महाराष्ट्राचे एक मंत्री नारायण राणे यांनी अविश्वास ठरावाच्या वेळी लोकसभेत केलेले भाषण मोदी यांनी ऐकायला हवे. महाराष्ट्राच्या उदात्त संस्कृतीची लाज घालवणारे ते भाषण. ‘सामना’ने अशी भाषा कधी वापरली नाही. धोरणांवर टीका करणे हे वेगळे व खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका करणे वेगळे. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव हे उद्धव ठाकरे यांच्या कृपेने दोनदा खासदार झाले. त्यांनी संसदेत वापरलेली भाषा ही भाजपच्या नव्या संस्कृतीला शोभणारी आहे व हेच लोक आता भाजपच्या अधोगतीला कारणीभूत ठरणार आहेत. 2024 च्या विजयासाठी मोदी-शहांना दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागतात व भ्रष्टाचाऱ्यांची मोट बांधून त्यांची वारेमाप स्तुती करावी लागते. हाच त्यांचा पराभव आहे! 2024 च्या मोठय़ा पराभवाची ही सुरुवात आहे. विचार करणाऱ्या माणसाची विचार करण्याची सवय नाहीशी होईल अशा गोंधळाच्या कालखंडात आपण सध्या वावरत आहोत. देशातील समस्यांवरचे मूलभूत तोडगे कोणते याचा विचार करण्यास पंतप्रधानांकडे वेळ नाही. पेटलेल्या मणिपूरवर राहुल गांधी कडक बोलले. त्यांचे परखड बोलणे भाजपास पटणार नाही. राहुल गांधी आता दुसऱ्या ‘भारत जोडो’ यात्रेला निघाले आहेत. गुजरातच्या गांधीभूमीवरून ती सुरू होईल व ईशान्येकडे निघेल. त्यात मणिपूर आहेच. त्यानंतर मोदी-शहांनी घेतल्याच तर सार्वत्रिक निवडणुका होतील. देश त्याचीच वाट पाहत आहे. मोदींना इतिहास घडवण्याची संधी नियतीने दिली. मोदींनी काहीच घडवले नाही. एक नवे संसद भवन उभारले, ते सुरू होण्याआधीच पावसात गळू लागले. ‘भारत छोडो’ आंदोलनातून निर्माण झालेल्या स्वातंत्र्याची पहाट संसद भवनात उगवली ते संसद भवन मोदींना नकोसे झाले. तरीही ते ‘भारत छोडो’चे नारे आपल्या विरोधकांविरुद्ध देताना त्याच ऐतिहासिक संसदेने पाहिले.

देश परिवर्तनाच्या दिशेने वेगात निघाला आहे!
2024 च्या विजयी लढाईचे रणशिंग फुंकण्यात आले आहे.

Twitter – @rautsanjay61
Email – [email protected]