पंचांनी डोळे उघडे ठेवावेत, विराट कोहली भडकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, बंगळुरू

जोस बटलरला ‘मंकडाइट’ पद्धतीने धावचीत केल्यानंतर रविचंद्रन अश्विनसह पंच व सामनाधिकारी यांना टीकेचा सामना करावा लागला. आता आयपीएलमध्ये पुन्हा एकदा पंचांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुरुवारी झालेल्या लढतीत 20व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर लसिथ मलिंगाचा पाय रेषेबाहेर पडल्यानंतरही पंच एस. रवी यांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे संतापलेल्या कर्णधार विराट कोहलीने सामनाधिकाऱ्यांच्या रूममध्ये जाऊन शिवीगाळ केली. तसेच यावेळी तो म्हणाला, आयपीएलसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असतो. हे काही क्लब क्रिकेट नाही. येथे थोडय़ाशा फरकाने सामन्याच्या निकालावर फरक पडतो. पंचांनी मैदानावर डोळे उघडे ठेवून उभे राहणे अपेक्षित आहे, असे स्पष्ट मतही त्याने पुढे व्यक्त केले. मात्र आयपीएलमधील लढतींमध्ये चुकीचे निर्णय देण्यात आल्यामुळे पंच रडारवर आले आहेत.

काय आहे प्रकरण

मुंबई इंडियन्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामधील लढतीच्या अखेरच्या षटकात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर विजयासाठी 17 धावांचे आव्हान होते. तसेच अखेरच्या चेंडूवर 7 धावांची गरज होती. लसिथ मलिंगाच्या अखेरच्या चेंडूवर शिवम दुबेला एकही धाव घेता आली नाही. पण हा चेंडू नो बॉल होता. मात्र पंच एस. रवी यांनी याकडे लक्ष दिले नाही. तसेच याआधी पंच नंदन यांनी जसप्रीत बुमराहचा चेंडू वाईड नसताना तो वाईड दिला.