ईशान्येकडच्या राज्यात धर्मांतरणासाठी ‘Amazon’ चा पैसा, संघाशी निगडीत मासिकाचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘द ऑर्गनायझर’ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसणीचा पुरस्कार आणि प्रचार करणारे इंग्रजी मासिक आहे. या मासिकाने एक कव्हर स्टोरी प्रसिद्ध केली असून यात म्हटले आहे की अमेझॉन (AMAZON) ही दिग्गज ऑनलाईन शॉपिंग कंपनी ही ईशान्येकडच्या राज्यांत धर्मांतरणासाठी पैसा पुरवत आहे. ‘Amazing Cross Connection’ या मथळ्याखाली या मासिकाने एक वृत्तलेख प्रसिद्ध केला आहे. यामध्ये म्हटलंय की अमेझॉनचे, ‘अमेरिकन बाप्टीस्ट चर्च’ नावाच्या एका संघटनेशी आर्थिक संबंध आहेत. ही संघटना ईशान्येकडच्या राज्यात धर्मांतरणाचे काम करत आहे असा आरोप या लेखात करण्यात आला आहे. अमेझॉनने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन अमेरिकन बॅप्टिस्ट चर्चद्वारे चालवल्या जाणार्‍या ख्रिस्ती धर्मांतराला अर्थपुरवठा करत असल्याचे द ऑर्गनायझन या मासिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तलेखात म्हटले आहे. बड्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि अमेरिकन बाप्टीस्ट चर्च द्वारे आर्थिक गैरव्यवहार केला जात असून हा पैसा हिंदुस्थानात धर्मांतरासाठी वापरला जात असल्याचे या वृत्तलेखात म्हटले आहे.  अमेरिकन बॅप्टिस्ट चर्च हिंदुस्थानात ‘ऑल इंडिया मिशन’ नावाची संघटना चालवत असून या संघटनेच्या वेबसाईटवर दावा करण्यात आला आहे की त्यांच्या संघटनेने ईशान्येकडच्या राज्यातील 25 हजार लोकांचे धर्मांतर केले आहे.

या वृत्तलेखामध्ये ऑल इंडिया मिशनद्वारे करण्यात आलेल्या एका ट्विटचाही उल्लेख करण्यात आला आहे. या ट्विटमध्ये अमेझॉनच्या वतीने निधीसाठी आवाहन करण्यात आले होते. यासाठी अमेझॉनचे बोधचिन्हही वापरण्यात आले होते असं या लेखात म्हटले आहे. हिंदुस्थानी नागरीक अमेझॉनवर जी खरेदी करतात त्यातून मिळालेला पैसा हा अमेझॉन ऑल इंडिया मिशनला दान करत असल्याचं या लेखात म्हटले असून हाच पैसा धर्मांतरासाठी वापरला जात असल्याचेही म्हटले आहे. या लेखाबाबतचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केले असून त्यांच्या प्रतिनिधीने अमेझॉन इंडियाच्या प्रवक्त्याशी  संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की अमेझॉन इंडियाचा आणि ऑल इंडिया मिशनचा काडीमात्र संबंध नाहीये.  अमेझॉन स्माईल नावाने निधी गोळा करण्यासाठीची  मोहीम अमेझॉन इंडियातर्फे चालवण्यात येत असली तरी दात्यांना आर्थिक मदत कोणाला करायची आहे हे निरनिराळ्या सामाजिक संस्थांच्या पर्यायातून निवडता येत असल्याचे प्रवक्त्याने म्हटले आहे.