
सामना प्रतिनिधी । मालवण
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत मालवण पालिकेने देशाच्या पश्चिम विभागात ५० वा क्रमांक मिळविला आहे. यामुळे विभागात ५० क्रमांक पर्यंत मिळणारा पाच कोटी रुपयांचा विशेष शासन निधी पालिकेला मिळणार आहे. पाच राज्यात मालवण पालिकेने मिळविलेले हे यश आम्ही शहरवासीयांना समर्पीत करत असल्याचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पालिका सभागृहात गुरुवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी मुख्याधिकारी रंजना गगे, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, आरोग्य सभापती आप्पा लुडबे, गणेश कुशे, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, मंदार केणी, पंकज सादये, नितीन वाळके, पूजा सरकारे, तृप्ती मयेकर, ममता वराडकर, सुनीता जाधव, दीपक पाटकर, यतीन खोत, जगदीश गावकर आदी उपस्थित होते.
स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ या स्पर्धेमध्ये पालिकेने पश्चिम विभागातील ८७६ पालिकांमध्ये ५० वा क्रमांक मिळविला. यामुळे पालिकेला पाच कोटींचे बक्षीस मिळाले. तर देशातील ३ हजार ६७१ एवढ्या पालिकांमधून मालवण पालिकेस ७८ वा क्रमांक मिळाला असून ही बाब अभिनंदनीय आहे. शहरवासीयांच्या सहकार्यामुळेच आम्ही बक्षीसास पात्र ठरलो. मुख्याधिकारी रंजना गगे यांनी उपलब्ध कर्मचार्यांच्या सहकार्याने जी यंत्रणा राबविली त्यामुळेच हे यश मिळाले. प्रशासकीय कर्मचार्यांनी केवळ प्रशासकीय काम म्हणून न पाहता शहराच्या हिताच्या दृष्टीने अभियान राबविले. विरोधी पक्षाचेही चांगले सहकार्य लाभले. कुठलेही राजकारण न करता सर्व नगरसेवकांनी एकत्रित सहभाग दिला. अभियानात यश मिळविण्यासाठी काही तातडीने निर्णय घ्यावे लागले त्यालाही सर्वांनी साथ दिली. स्वच्छता सल्लागार समितीने वेळोवेळी दिलेल्या सूचना, केलेले सहकार्य त्याचप्रमाणे या सर्व्हेक्षणाचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर, स्वच्छता दूत, सेवाभावी संस्था, प्रशाला, बँका यांनी सहकार्य केल्याने यश मिळाले. पालिकेला मिळणार्या बक्षिसाच्या रक्कमेतून नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना येत्या काळात केल्या जातील असे नगराध्यक्षांनी सांगितले.
स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात कचरा वर्गीकरणात आम्ही कमी पडलो. मात्र भविष्यात देशात पहिल्या दहामध्ये येण्यासाठी जोमाने काम केले जाईल. अभियानात राबविण्यात आलेल्या सर्व योजना आजही सुरू असून आता कचरा उठविण्यासाठी पाच नवीन गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. स्वच्छतेसाठी १ कोटी ९५ लाख रुपयांचा आराखडा मंजूर असून त्यानुसार कामे केली जातील. स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये जाहीर केलेल्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण लवकरच होईल असे लुडबे यांनी सांगितले.
शासनाने राबविलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये पालिकेने मेहनत घेत अभियान यशस्वी केले. तीनदा येथील अभियानाची तपासणी झाली. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण होणारा कचरा व समुद्रातून बाहेर पडणारा कचरा याची विल्हेवाट लावण्याचे काम करण्यात आले. त्यानंतरही पश्चिम विभागात पहिल्या दहामध्ये क्रमांक न मिळाल्याची खंत माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी व्यक्त केली.































































