चर्चा निष्फळ, युद्ध सुरूच; आधी परत जा – युक्रेन,   शस्त्रे खाली ठेवून शरण या – रशिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या रशिया-युक्रेनमधील चर्चा निष्फळ ठरली असून युद्धाचा भडका कायम आहे. रशियन फौजांनी आधी परत जावे, अशी ठाम भूमिका युक्रेनने घेतली, तर युक्रेनियन सैन्याने शस्त्रे खाली ठेवावीत, अशी अट रशियाने ठेवली. त्यामुळे बेलारूसच्या सीमेवर दोन्ही देशांच्या शिष्टमंडळात साडेतीन तास सुरू असलेल्या चर्चेतून तोडगा निघालेला नाही असे वृत्त आहे. दरम्यान, रशियाने राजधानी कीव्हसह अनेक ठिकाणी हल्ले वाढविले असून अणुयुद्धाचा धोका कायम आहे. तर दुसरीकडे युक्रेनला युरोपियन देशांकडून शस्त्रास्त्रे मिळणार आहेत.

 युद्धाच्या पाचव्या दिवशी रशिया आणि युक्रेनने चर्चेची तयारी दर्शविली. बेलारूस सीमेवर एका अज्ञातस्थळी दोन्ही देशांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळात साडेतीन तासांहून अधिक वेळ चर्चा झाली. या शिष्टमंडळात वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि नेते होते.

चर्चेपूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्यापुढे दोन अटी टाकल्या होत्या.

युद्ध थांबवायचे असेल तर रशियन फौजांनी युक्रेनमधून परत फिरावे आणि शस्त्रसंधी करावी, युक्रेनला युरोपियन युनियनमध्ये सामील करावे, असे झेलेन्स्की यांनी म्हटले.

चर्चेदरम्यान युक्रेन शिष्टमंडळ यावर ठाम राहिले. रशियानेही आधी युक्रेन सैन्याने शस्त्र खाली ठेवावे, शरण यावे अशी अट टाकली. अखेर ही पहिली चर्चा निष्फळ झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये पुन्हा लवकरच चर्चा होण्याची शक्यता आहे.

अण्वस्त्र हल्ल्याचा प्लॅन तयार

 युद्ध सुरू झाल्यास अवघ्या 16 तासांत युक्रेनची राजधानी कीव्हवर ताबा घेऊ. युक्रेन ताब्यात येईल, अशी योजना रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांची होती. मात्र युक्रेन सैन्य आणि नागरिक जोरदार प्रत्युत्तर देत असल्यामुळे रशियाने अण्वस्त्र डागण्याची योजना आखली आहे.

रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी सोमवारी पुतीन यांना अणुयुद्धाचा प्लॅन तयार असल्याचे सांगितले. तसेच अण्वस्त्र कमांड युनिटमधील शास्त्रज्ञ आणि अधिकाऱयांच्या सुट्टय़ा रद्द केल्याचे वृत्त ‘स्पुटनिक’ या रशियन वृत्तसंस्थेने दिले आहे.

युक्रेनचा शेजारी असलेला आणि रशियाचा मित्र असलेल्या बेलारूसमध्ये सोमवारी रशियाला त्यांची अण्वस्त्रे आणि सैन्य बेलारूसमध्ये कायमस्वरूपी तैनात करण्यास परवानगी दिली आहे.

पंतप्रधान मोदींकडून दोन वेळा बैठक; चार मंत्री युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाणार

युक्रेनमध्ये अद्याप 16 हजारांवर हिंदुस्थानी विद्यार्थी अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दोन वेळा उच्चस्तरीय बैठक घेतली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ सुरू केले आहे. युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये एअर इंडियाचे विमान जात असून विद्यार्थ्यांना तेथून मायदेशी आणले जात आहे. यासाठी चार केंद्रीय मंत्री शेजारील देशांमध्ये जाणार आहेत. यामध्ये हरदिपसिंग पुरी हंगेरीत, ज्योतिरादित्य शिंदे सोमानिया आणि मालदोवा येथे, किरण रिजिजू स्लोवाकियाला तर जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंह पोलंडला जातील.