अपघाती मृत्यू झालेल्याला अनेक वाहनांनी चिरडले, कोल्हापूर-नागपूर महामार्गावरील मिरजेतील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

  कोल्हापूर ते नागपूर महामार्गावर सांगली जिह्यातील निलजी-बामणी गावाजवळ रविवारी रात्री उशिरा एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनासह चालकाने पळ काढला. मात्र, त्यानंतर महामार्गावरून जाणाऱया अनेक वाहनांनी चिरडल्याने या मृतदेहाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता.

 माणुसकीला काळिमा फासणारी घटना सांगली जिह्यातील मिरजनजीकच्या महामार्गावर घडली. त्यामुळे आज अनेकांनी हळहळ व्यक्त केली. कोल्हापूर ते नागपूर महामार्गावर सांगलीच्या निलजी-बामणी गावजवळच्या हद्दीवरील महामार्गावर एका अनोळखी व्यक्तीचा रविवारी रात्री अपघाती मृत्यू झाला. हा अपघातानंतर मृताच्या अंगावरून अनेक वाहने गेली. यात मृताच्या शरीराचे तुकडे-तुकडे झाले. सकाळी या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, मृत व्यक्तीची उशिरापर्यंत ओळख पटली नाही अथवा एखादा नातेवाईकही पोलिसांपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे ही मृत व्यक्ती बेघर असल्याची नोंद मिरज ग्रामीण पोलिसांनी केली आहे. हा मृतदेह अक्षरशः पोत्यात भरून नेण्याची वेळ पोलिसांवर आली.

 एकाही वाहनचालकाच्या लक्षात ही बाब आली नाही, हे दुर्दैव आहे. या मृतदेहावरून अनेक गाडय़ा गेल्याने या मृतदेहाचा चेंदामेंदा झाला होता. अपघातात मृत झालेला हा इसम बेघर असल्याची प्राथमिक माहिती आहे. मिरज ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.