सामना अग्रलेख – जंगलपहाडातला योद्धा!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जनरल बिपीन रावत हे संरक्षण दलास नवे रूप, नवा आकार देत होते. म्हणूनच या अपघाताने अनेक प्रश्न व शंकांचे काहूर माजले आहे. हे का झाले? कसे झाले? त्यांच्या अंगावर लष्करी गणवेश होता. जनरल लष्करी संस्थेत एका व्याख्यानासाठी निघाले होते. ते कर्तव्य बजावत असतानाच शहीद झाले. जंगलपहाडातला हा योद्धा शेवटी जंगलातच कोसळला. अनेक युद्ध रहस्ये, पुलवामासह अनेक रहस्ये जनरल रावत यांच्याबरोबर कायमची नष्ट झाली. कधीतरी जनरल रावत यांनी त्यावर प्रकाश टाकलाच असता. महान योद्धा, देशाचा शूर सुपुत्र जनरल बिपीन रावत यांना मानाचा मुजरा!

देशावर एकापाठोपाठ एक संकटे कोसळत आहेत, पण देशाच्या तीनही सेनादलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूने देश हादरला आहे. हिंदुस्थानी हवाई दलाच्या एमआय-17 व्ही 5 या अत्यंत सुरक्षित आणि अत्याधुनिक हेलिकॉप्टरला बुधवारी दुपारी तामीळनाडूतील कुन्नूर दाट जंगलात अपघात झाला. हेलिकॉप्टरला हवेतच आगीच्या ज्वाळांनी लपेटले व ते खाली कोसळले. जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह संरक्षण दलाचे 13 अधिकारी व कर्मचारी त्यात ठार झाले आहेत. जनरल रावत हे शूर योद्धा होते. देशाच्या संरक्षणासाठी संकटांना छातीवर झेलणारे निधडय़ा छातीचे वीर होते. एक योद्धा म्हणून ते अनेक अपघातांना आणि संकटांना सामोरे गेले आहेत. 2015 साली जनरल रावत यांच्या हेलिकॉप्टरला नागालॅण्ड येथे अपघात झाला होता. त्यांच्या चॉपरने हेलिपॅडवरून उड्डाण केले व क्षणात ते खाली आले. त्यानंतर अधिकाऱयांच्या बैठकीत ते हसत हसत म्हणाले, “मी डोंगरपहाडातला माणूस आहे. अशा लहानसहान अपघातांत प्राण गमावणार नाही.’’ जनरल रावत हे प्रत्यक्ष रणांगणावरचे सैनिक होते. त्यांच्या अस्तित्वानेच अनेकदा दुष्मनांना धडकी भरत असे. 37 वर्षे त्यांनी लष्कराचा गणवेश आणि शौर्यपदके छातीवर अभिमानाने मिरवली. 1979 साली सुरू झालेली त्यांची ही लष्करी सेवा बुधवारी दुपारी संपली. लडाख भागात चीनने छुपे अतिक्रमण केले आहे. कश्मीरात पाकडय़ांच्या दळभद्री कारवाया सुरूच आहेत. अशावेळी ‘‘एक इंच जरी आमच्या जमिनीवर घुसखोरी केलीत तर आहात तिथेच जमिनीत गाडू’’ असे सांगणारा व कृती करणारा सेनापती देशाने गमावला आहे. बिपीन रावत यांनी देशाचे लष्करप्रमुख म्हणून सेवा बजावली व लगेच देशाचे संरक्षण दलप्रमुख म्हणून नेतृत्व स्वीकारले. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे देशाच्या तीनही सेनादलांचे प्रमुख हे नवे पद निर्माण झाले. तिन्ही दलांचे

पहिले सेनापती

म्हणून जनरल रावत यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. रावत यांनी संरक्षण दलाच्या संपूर्ण अत्याधुनिकीकरणावर भर दिला. देशाच्या सर्वोच्च टोकावरील प्रत्येक सैनिकास सर्व आधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी ते काम करीत राहिले. जनरल रावत यांचे वडील लष्करात होते. त्याच ‘फौजी’ कुटुंबाचा वारसा त्यांनी पुढे नेला. दुष्मनांवर थेट हल्ला करण्यावर त्यांचा भर होता. 2015 मध्ये म्यानमारमध्ये पॅराशूट रेजिमेंटचे जवान उतरवून त्यांनी मणिपूरमध्ये अतिरेक्यांनी जवानांवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेतला. 2016 साली ‘उरी’ हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. त्यातही जनरल रावत यांचा सहभाग होता. ‘जिथे संकट व साहस, तिथे जनरल रावत’ हे अनेक वर्षे ठरूनच गेले. जनरल रावत यांनी देशाला व सैनिकांना सतत प्रेरणा दिली. 12 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांनी ठणकावून सांगितले होते, “कोणीही अतिरेकी आमच्यावर हल्ला करील, त्याला 48 तासांत संपवून टाकू!’’ जम्मू-कश्मीरातील पुलवामा दुर्घटनेने देश हादरून गेला. पुलवामा हल्ला व जवानांची हत्या हे एक राजकीय षड्यंत्र असल्याचे आरोप झाले. पुलवामा हल्ल्याचा मास्टर माइंड आणि जैश-ए-मोहम्मदचा कमांडर कामरान हा नंतर लष्कराच्या चकमकीत मारला गेला. तेव्हा जनरल रावत यांनी कश्मीरात जाऊन अतिरेक्यांना दम भरला, “पुन्हा कारगील आणि पुलवामा कराल तर याद राखा. मसूद अजहर असेल किंवा दुसरा कोणी, या भूमीवरून आम्ही आतंकवाद संपवून टाकू.’’ पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचाच हात असल्याचे पुरावे आहेत हे त्यांनी तेव्हा इम्रान खान यांना ठणकावून सांगितले होते. जनरल रावत हे उत्तराखंडच्या पहाडी भागाचे सुपुत्र होते. त्यांना उंच पहाडी भागात युद्ध लढण्याचा अनुभव होता. लष्करातील बराच मोठा काळ त्यांनी एलओसी, चीन बॉर्डर आणि ईशान्येकडील अशांत प्रदेशात घालवला होता. जनरल रावत एक जांबाज सैनिक होते.

प्रखर देशभक्त

आणि सैन्यात जोश भरणारे सेनापती होते. रावत संरक्षण दलांच्या बैठकांतून जाणीव करून देत की, “आपण अत्याधुनिक व तांत्रिक बाबतीत चीनपेक्षा मागे आहोत व हिंदुस्थानी संरक्षण दलातील ही कमतरता लवकरच दूर करावी लागेल. नवे तंत्रज्ञान आणि भविष्यातील सतत बदलत जाणाऱया युद्धनीतीवर काम करावे लागेल.’’ त्यावर त्यांचा भर होता. हिंदुस्थानचे संरक्षण दल जगातील सक्षम आणि अत्याधुनिक बनावे यासाठी ते काम करीत होते. जनरल रावत हे तडकाफडकी बोलणारे व मोकळ्या स्वभावाचे होते. त्यांनी संरक्षण दलात अत्याधुनिकतेची कास धरली, पण ‘एमआय-17 व्ही 5’ या हिंदुस्थानी नौदलाच्या सगळ्यात अत्याधुनिक हेलिकॉप्टरचाच अपघात झाला आणि त्यात रावत यांचे निधन झाले. रशियन बनावटीचे हे चॉपर हिंदुस्थानी नौदलाचे सगळ्यात सुरक्षित ‘वाहक’ मानले गेले आहे. त्यास अत्यंत सक्षम ‘पॉवरफुल’ दोन इंजिन, संकटकाळात कुठेही उतरण्याची व्यवस्था असते. तरीही हे अत्याधुनिक चॉपर कोसळले. जनरल रावत यांच्यासह 13 जणांनी त्यात प्राण गमावले. जनरल रावत हे संरक्षण दलास नवे रूप, नवा आकार देत होते. म्हणूनच हा अपघात धक्कादायक आहे. त्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असले तरी अपघात हा शेवटी अपघात असतो. तो तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख असलेल्या लष्करी अधिकाऱयाच्या हेलिकॉप्टरचा झाला म्हणून अकारण वावडय़ा उठविणे योग्य नाही. जनरल रावत यांचे हेलिकॉप्टर हवेत पेटले व खाली कोसळले. त्यांच्या अंगावर लष्करी गणवेश होता. जनरल लष्करी संस्थेत एका व्याख्यानासाठी निघाले होते. ते कर्तव्य बजावत असतानाच शहीद झाले. जंगलपहाडातला हा योद्धा शेवटी जंगलातच कोसळला. अनेक युद्ध रहस्ये, पुलवामासह अनेक रहस्ये जनरल रावत यांच्याबरोबर कायमची नष्ट झाली. कधीतरी जनरल रावत यांनी त्यावर प्रकाश टाकलाच असता. महान योद्धा, देशाचा शूर सुपुत्र जनरल बिपीन रावत यांना मानाचा मुजरा!