सामना अग्रलेख – गृहमंत्र्यांचे इशारे-नगारे, दंगली हाच यांचा आधार!

प्रत्येक मुद्द्यावरून धार्मिक उन्माद वाढविण्याचा, दंगली भडकविण्याचाच प्रयत्न भाजप का करीत आहे? जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी त्यांना फक्त दंगलीच का दिसत आहेत? प्रश्न अनेक असले तरी त्यांचे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे दंगली हाच भाजपच्या राजकारणाचा आणि सत्ताकारणाचा आधार बनल्या आहेत. कर्नाटकातही बोम्मई सरकारचे जाजम तेथील जनता खेचून घेणार याची जाणीव भाजपला झाल्यानेच केंद्रीय गृहमंत्र्यांनी पुन्हा एकदा दंगलींचे इशारे-नगारे वाजविले आहेत. अर्थात, प्रश्न त्यांच्या नगाऱ्यांचा नसून देशातील जातीय, धार्मिक शांतता आणि सलोख्याचा आहे. कर्नाटकातील जनता हा ‘नगारा’ फोडेल आणि भाजपच्या विद्वेषी राजकारणाचा भंडाफोड करेल, हे नक्की!

कर्नाटकातील सत्ता हातातून जाणार याची खात्री बहुधा भाजपला झाली असावी. त्यामुळेच त्यांनी पुन्हा जातीय-धार्मिक दंगलींचा बागुलबुवा तेथे उभा करण्यास सुरुवात केली आहे. ‘कर्नाटकात काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर राज्यात घराणेशाहीचे राजकारण पुन्हा जोर धरेल आणि दंगलींमध्ये हे राज्य होरपळून निघेल,’ असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री गेले दोन दिवस कर्नाटकच्या प्रचार दौऱ्यावर होते. तेच नव्हे तर भाजपच्या ‘स्टार’ प्रचारकांचा ताफाच त्या ठिकाणी म्हणे प्रचाराचा धुरळा उडवीत आहे, पण तरीही केंद्रीय गृहमंत्र्यांना कानडी जनतेला दंगलींची भीती दाखवावीशी का वाटली? वास्तविक, मागील पाच वर्षे कर्नाटकात भाजपचेच सरकार आहे. त्यामुळे ‘विकासावर मते मागा’ असा शहाणपणा इतरांना शिकविणाऱ्या भाजप मंडळींनी कर्नाटकात बोम्मई सरकारच्या पाच वर्षांच्या कारभाराचा दाखला देत मतांचा जोगवा मागायला हवा होता. मात्र त्याऐवजी केंद्रीय गृहमंत्र्यांनी जातीय दंगलींचे भूत नाचवले. कारण ना बोम्मई सरकारचे गुण गाण्यासारखे त्यांच्याकडे काही आहे, ना लिंगायत समाजाचा पाठिंबा शाबूत राहण्याची खात्री. त्यामुळेच धार्मिक वाद, दंगलींचे भूत उकरून काढायचे आणि मतांचे धृवीकरण करीत स्वतःचा राजकीय स्वार्थ साधायचा, हा नेहमीचा खेळ भाजपने कर्नाटकात सुरू केला आहे. पराभव दिसू लागला की भाजप हाच फंडा वापरतो. जातीय, धार्मिक विद्वेष पसरवायचा आणि त्या आगीवर आपल्या राजकीय स्वार्थाच्या पोळय़ा भाजायच्या. जीवन-मरणाच्या प्रश्नांवरून

जनतेचे लक्ष हटावे

यासाठी धार्मिक मुद्द्यांचे भूत जनतेच्या मानगुटीवर बसवायचे, जनतेला हिंदू-मुस्लिम वादाच्या गुंगीत ठेवायचे आणि सत्तेचा कार्यभाग साधायचा हेच या मंडळींचे राजकारण आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून देशात आणि राज्याराज्यांत भाजपच्या या विद्वेषी राजकारणाचा अनेकदा प्रत्यय आला आहे. त्यासाठी वेगवेगळय़ा मुद्दय़ांचा आधार घेतला जातो. काही वर्षांपूर्वी कथित ‘गो-रक्षकां’च्या टोळय़ांच्या उन्मादाला खतपाणी घातले गेले होते. म्हणजे भाजपशासित राज्यांत गोमांस विक्री सुरू ठेवायची, यांच्या नेत्यांनी गोमांस भक्षणाची ग्वाही जाहीरपणे द्यायची, मात्र विरोधकांच्या राज्यांत याच मुद्दय़ांवरून धार्मिक तेढ निर्माण करायची आणि राजकारण साधायचे हे उद्योग केले गेले. ‘सीएए’ म्हणजे ‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा’ यालाही देशनिष्ठेचा मुलामा लावला गेला, पण त्याचा अंतस्थ हेतू राजकीय फायद्याचाच होता. त्यासाठीच ‘सीएए’चा डिंडोरा पिटला गेला आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंत अनेक राज्यांत दंगलींचा आगडोंब उसळला. आधीच अस्थिर असलेली आसामसह ईशान्येकडील राज्ये या कायद्यामुळे आणखी अशांत होतील, या इशाऱ्याकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. प. बंगालमध्ये याच रक्तरंजित जातीय राजकारणाचा आधार भाजप घेत आला आहे. कधी दुर्गापूजेच्या निमित्ताने तर कधी इतर कारणाने तेथे हिंदू-मुस्लिम दंगली घडविण्याचे त्यांचे उद्योग सुरूच असतात. बिहारमध्ये नितीशकुमार यांनी काडीमोड घेतल्याने भाजपला सत्तेतून बेदखल व्हावे लागले. त्यामुळे लगेच त्यांना तेथेही जातीय तणावांची उचकी लागली. हनुमान जयंती, रामनवमीच्या दिवशी राज्याराज्यात उसळलेल्या दंगली भाजपच्या धार्मिक राजकारणाचाच भाग होता. शहरांचे नामबदल, बुलडोझर कारवाई आणि एन्काऊंटरचा बोभाटा करून उत्तर प्रदेशात हिंदूंच्या मनात

उन्मादी लाटा

निर्माण करण्याचे आणि त्यावर पुढील निवडणुकीत राजकीय स्वार्थ साधायचेच या मंडळींचे मनसुबे आहेत. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि जातीय सलोख्याचा आदर्श असलेल्या राज्यालाही धार्मिक दंगलींच्या वाटेवर नेण्याचे भाजपचे प्रयत्न सुरूच आहेत. पुन्हा विरोधकांनी त्यावरून टीका केली तर ‘विरोधकांना दंगली घडवायच्या आहेत का?’ असा उफराटा सवाल हीच मंडळी करणार. मग आता हाच प्रश्न कर्नाटकातील जनतेने अमित शहा यांना विचारायचा का? काँग्रेस सत्तेवर आल्यास कर्नाटक दंगलींमध्ये होरपळून निघेल, असा जाहीर दावा त्यांनी केला, तो नेमका कशाच्या जोरावर? ते देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांनीच स्वार्थी राजकारणासाठी अशी सनसनाटी निर्माण करायची की गृहमंत्री या नात्याने कर्तव्य पार पाडायचे? मुद्दा गाईंचा असो, दुहेरी नागरिकत्व कायद्याचा असो, रामजन्मभूमी किंवा रामनवमी-हनुमान जयंतीचा असो, लव्ह जिहाद किंवा लँड जिहादचा असो की हिजाब बंदीचा; प्रत्येक मुद्दय़ावरून धार्मिक उन्माद वाढविण्याचा, दंगली भडकविण्याचाच प्रयत्न भाजप का करीत आहे? जळी, स्थळी, काष्ठाr, पाषाणी त्यांना फक्त दंगलीच का दिसत आहेत? प्रश्न अनेक असले तरी त्यांचे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे दंगली हाच भाजपच्या राजकारणाचा आणि सत्ताकारणाचा आधार बनल्या आहेत. कर्नाटकातही बोम्मई सरकारचे जाजम तेथील जनता खेचून घेणार याची जाणीव भाजपला झाल्यानेच केंद्रीय गृहमंत्र्यांनी पुन्हा एकदा दंगलींचे इशारे-नगारे वाजविले आहेत. अर्थात, प्रश्न त्यांच्या नगाऱयांचा नसून देशातील जातीय, धार्मिक शांतता आणि सलोख्याचा आहे. कर्नाटकातील जनता हा ‘नगारा’ फोडेल आणि भाजपच्या विद्वेषी राजकारणाचा भंडाफोड करेल, हे नक्की!