
आफ्रिकेत ‘इसिस’चे 2500 अतिरेकी कार्यरत असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांनीच व्यक्त केला आहे. मोझांबिकमध्ये आता झालेल्या सामूहिक हत्याकांडाने त्याचीच पुष्टी केली आहे. ‘इसिस’च्या अमानुष कारवाया थांबलेल्या नाहीत, ‘इसिस’ आणि क्रूरतेचा कळस हे समीकरण आजही कायम आहे याचा पुरावा म्हणूनच ‘इसिस’ने घडविलेल्या या निर्घृण सामूहिक हत्याकांडाकडे पाहावे लागेल. मधल्या काळात ‘इसिस’च्या कारवाया कमी झाल्या असे चित्र निर्माण झाले होते. मोझांबिकमधील हत्याकांडाने ते पुसून टाकले आहे.
इस्लामी काय किंवा इतर कोणत्याही दहशतवादी संघटना काय, त्यांच्या कारवाया अत्यंत अमानवी असतात. मात्र त्यातही ‘इसिस’सारख्या इस्लामी दहशतवादी संघटनेने अमानुषता आणि क्रूरता यांची व्याख्याच बदलवून टाकली आहे. त्याचा प्रत्यय इसिसच्या ठिकठिकाणच्या कारवाया आणि हत्यांमध्ये आला आहे. आताही दक्षिण आफ्रिकेतील या संघटनेचे क्रूरतेची परिसीमा गाठणारे सामूहिक हत्याकांड समोर आले आहे. मानवी संवेदना गोठविणारे हे हत्याकांड आफ्रिकेतील मोझांबिक या देशात घडले आहे. तेथील कँबो डेलगाडो राज्यातील नांजबा या संपूर्ण गावाचाच इसिसच्या दहशतवाद्यांनी खात्मा केला. गावातील 50 जणांचे एका फुटबॉल स्टेडियममध्ये एकाच वेळी गळे चिरले, त्यांच्या देहाचे तुकडे करून ते जंगलात फेकले आणि नंतर संपूर्ण गाव आग लावून भस्मसात केले. एवढय़ावरच या दहशतवाद्यांची अमानुषता थांबली नाही तर गावातील सर्व महिलांचे देहविक्रीसाठी अपहरण केले. हे जे हत्याकांड करण्यात आले त्यामागे नेहमीचेच कारण आहे. ‘इसिस’मध्ये सहभागी होण्यास गावातील लोकांनी नकार दिला. त्याचा
बदला म्हणून
त्यांची सामूहिक कत्तल करण्यात आली. दहशतवादीच नव्हे, तर गुन्हेगारी गँगचीदेखील कार्यपद्धती यापेक्षा वेगळी नसतेच. कारण त्याशिवाय संघटना किंवा टोळीची दहशत पसरत नाही, पण ‘इसिस’ने या निर्घृणतेच्या आणि अमानुषतेच्या सर्व सीमा पार केल्या. विरोधक किंवा अपहृत व्यक्तीचा ‘जाहीर’ गळा चिरणे आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल करणे ही पद्धती ‘इसिस’नेच अवलंबली. प्रामुख्याने इराकमधील अशा प्रकारच्या हत्याकांडांनी त्यावेळी संपूर्ण जगच हादरले होते. इराक, सीरिया आदी देशांत प्रामुख्याने इसिसचा धुमाकूळ असला तरी जगभरात तिचे जाळे पसरले आहे. 30 हजारांवर दहशतवादी आणि सुमारे दोन अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त संपत्ती असलेली जगातील सर्वात श्रीमंत दहशतवादी संघटना म्हणून ‘इसिस’चा बदलौकिक आहे. दक्षिण आफ्रिकेमध्येही ‘इसिस’ने आपले जाळे पसरविले आहे. तेथील बोको हराम वगैरे संघटनांचाही ‘इसिस’ला पाठिंबा आहे. आफ्रिकेत ‘इसिस’चे 2500 अतिरेकी कार्यरत असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांनीच व्यक्त केला आहे. मोझांबिकमध्ये आता झालेल्या
सामूहिक हत्याकांडाने
त्याचीच पुष्टी केली आहे. ज्या कँबो डेलगाडे राज्यात हे हत्याकांड घडले ते नैसर्गिक वायूच्या साठय़ांसाठी प्रसिद्ध आहे हीदेखील एक बाजू ‘इसिस’च्या दहशतवादी हल्ल्यामागे असण्याची शक्यता आहे. कारण या राज्यात ‘इसिस’ने मागील तीन वर्षांत तब्बल दोन हजारांपेक्षा जास्त लोकांची हत्या केली आहे. या दहशतीमुळे सुमारे साडेचार लाख लोक तेथून परागंदा झाले आहेत. ही दहशत, भीती आणखी वाढावी हा ताज्या हत्याकांडामागे ‘इसिस’चा हेतू असावा. आपल्या देशालाही ‘इसिस’चा धोका असल्याचे लपून राहिलेले नाही. कश्मीर, केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये प्रामुख्याने ही संघटना आपले ‘नेटवर्क’ प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. चारच महिन्यांपूर्वी पुण्याचेही ‘इसिस कनेक्शन’ उघड झाले होते. ‘इसिस’च्या अमानुष कारवाया थांबलेल्या नाहीत, ‘इसिस’ आणि क्रूरतेचा कळस हे समीकरण आजही कायम आहे याचा पुरावा म्हणूनच आफ्रिकेतील मोझांबिकमध्ये ‘इसिस’ने घडविलेल्या निर्घृण सामूहिक हत्याकांडाकडे पाहावे लागेल. मधल्या काळात ‘इसिस’च्या कारवाया कमी झाल्या असे चित्र निर्माण झाले होते. मोझांबिकमधील हत्याकांडाने ते पुसून टाकले आहे.

























































