सामना अग्रलेख – बंगालचे युद्ध!

. बंगालबाबत भाजपच्या नेत्यांना चिंता वाटते. चिंता वाटावी अशा अनेक घटना संपूर्ण देशात घडत आहेत. केंद्रीय बळ वापरूनही, दंगली पेटवूनही भाजपचा पराभव होतो हे . बंगालच्या पंचायत निवडणुकांनी दाखवून दिले. भाजपची खरी चिंता हीच आहे. लोक शहाणपणाने वागले तर हुकूमशाहीचा पराभव सहज होतो. . बंगालात ते दिसल़े  ममता बॅनर्जी बंगालचे युद्ध जिंकल्या. त्यांचे अभिनंदन!

पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. भारतीय जनता पक्षाने या निवडणुका जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर केला. केंद्रीय सुरक्षा दलाच्या फौजा पाठवून निवडणुकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण ममता बॅनर्जी यांनी तोडीस तोड मुकाबला केला. ममता यांनी एखाद्या वाघिणीसारखी झुंज दिली. साधारण 74 हजार पंचायतींसाठी निवडणुका झाल्या. भाजप, तृणमूलमध्ये लढत झाली व या निवडणुका एखाद्या युद्धाप्रमाणे लढल्या गेल्या. या युद्धात 40 जणांचा मृत्यू झाला. अनेक मतदान केंद्रांवर हिंसाचार, रक्तपात, जाळपोळ, बुथ लुटण्यासारखे प्रकार घडले. पण ग्रामपंचायतींच्या 35 हजार जागा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने जिंकल्या. भारतीय जनता पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपने 9,722 ग्रामपंचायती जिंकल्या. तथापि, एकाही जिल्हा परिषदेत ‘कमळ’ फुलले नाही. हिंसाचाराचे खापर आता एकमेकांवर फोडले जात आहे. काँग्रेस, डावे वगैरे पक्षांची घसरण झाली. प. बंगालातील पंचायत निवडणुकांत मोठय़ा प्रमाणात हिंसाचार झाल्याची बोंब भाजपने ठोकली. ममता बॅनर्जी यांनी कंबरडय़ात लाथ घातल्यानंतरचे हे केकाटणे आहे. प. बंगालमधील निवडणुकांत हिंसाचार होईल अशी भीती भाजप नेत्यांनी आधीच व्यक्त केली व त्यानुसार केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकडय़ा मोठय़ा प्रमाणात तैनात केल्या. तरीही हिंसाचार थांबला नाही व 40 च्या आसपास मृत्यू झाले असतील तर ते केंद्राचे अपयश आहे. मुळात ग्रामपंचायत निवडणुकांत केंद्राने

नाक खुपसण्याची गरज

नव्हती. तो राज्याचाच विषय होता, पण तृणमूल कार्यकर्त्यांवर दहशत निर्माण करण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दले पाठवली. तरीही हिंसाचार झाला. आता भाजपचे रविशंकर प्रसाद वगैरे लोक हिंसाचार का घडला याचे सत्यशोधन करण्यासाठी बंगालात पोहोचले. हासुद्धा एक घोटाळाच आहे. प्रसाद यांचे म्हणणे असे की, ममता बॅनर्जी यांनी लोकशाहीला कलंक लावला आहे. मुळात आपल्या देशात लोकशाही उरली आहे काय? या प्रश्नाचे उत्तर कोणी देऊ शकत नाही. प्रसाद यांनी लोकशाहीच्या नावाने गळा काढला हे ढोंग आहे. मोदी व शहांनी तर जागोजाग लोकशाहीस वधस्तंभावर चढवले आहे. प. बंगालमधील हिंसाचार निषेधार्ह आहे, मग मणिपुरातील हिंसाचारामागचे सत्यशोधन करण्यासाठी भाजपचे ‘सत्यवादी’ अद्याप का गेले नाहीत? मणिपूरला कोणत्याही निवडणुका नाहीत तरी संपूर्ण राज्य पेटले आहे. त्यावर पंतप्रधान मोदी सोडाच, तर भाजपचे एकही राष्ट्रीय पोपटलाल बोलायला तयार नाहीत. प. बंगालात हिंसाचार घडला म्हणून भाजप छाती पिटून घेत आहे. प. बंगालातील हिंसाचारात तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्तेही मरण पावले. यावर भाजप काय बोलणार? प. बंगालातील विधानसभा निवडणुका तृणमूलने जिंकल्या. आता लोकसभेची तयारी सुरू आहे. आगामी निवडणुकीची ‘लिटमस चाचणी’ म्हणून प. बंगालमधील निवडणुकांकडे पाहिले जात आहे व भाजपने जंग जंग पछाडूनही ममतांचा पराभव होऊ शकला नाही. ममता बॅनर्जी या जमिनीवर पाय रोवून उभ्या असलेल्या खंबीर नेत्या आहेत व त्यांच्या कार्यकर्त्यांचे जाळे मोठे आहे. तृणमूल काँग्रेसमध्येही

फाटाफूट करण्याचे प्रयत्न

झाले. पण एखाद्दुसरा सुबेंदू अधिकारी वगळता अमित शहांच्या गळास फारसे कोणी लागले नाही. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प. बंगाल हे महत्त्वाचे राज्य आहे. 40 वर लोकसभेच्या जागा तेथे आहेत व 2019 साली प. बंगालातून भाजपने लोकसभेच्या 18 जागा जिंकून ममता बॅनर्जी यांना हादरा दिला होता. प. बंगालातून लोकसभेच्या 18 जागा जिंकणे ही भाजपसाठी लॉटरीच होती. पण नंतरच्या विधानसभा निवडणुकांत ममतांनी तृणमूलचा गड राखला. प. बंगालातील जिंकलेल्या 18 जागांमुळे भाजप त्यावेळी 300 पार करू शकला, पण यावेळी भाजप प. बंगालात मागचा आकडा गाठू शकणार नाही व 2024 साली ते 200 पार तरी होतील काय? हाच प्रश्न आहे. दंगली भडकवून धर्मांधतेला खतपाणी घालून दोन निवडणुका जिंकल्या हे खरेच, पण आता ते शक्य नाही. आग लावणाऱ्यांना ती विझवायचीही अक्कल लागते. आपलाच देश, आपलेच राज्य राजकीय स्वार्थापोटी पेटवून मजा बघत राहायचे हे एखाद्या निर्घृण हुकूमशहालाच जमू शकते. प. बंगालबाबत भाजपच्या नेत्यांना चिंता वाटते. चिंता वाटावी अशा अनेक घटना संपूर्ण देशात घडत आहेत. केंद्रीय बळ वापरूनही, दंगली पेटवूनही भाजपचा पराभव होतो हे प. बंगालच्या पंचायत निवडणुकांनी दाखवून दिले. भाजपची खरी चिंता हीच आहे. लोक शहाणपणाने वागले तर हुकूमशाहीचा पराभव सहज होतो. प. बंगालात ते दिसल़े  ममता बॅनर्जी बंगालचे युद्ध जिंकल्या. त्यांचे अभिनंदन!