
राहुल बजाज हे हिंदुस्थानी उद्योग जगताचे नेते होते. ‘बुलंद भारत की बुलंद तस्वीर, हमारा बजाज’ हीच त्यांची ओळख होती. महाराष्ट्रातून ते राज्यसभेवर गेले. संसदेतही ते परखडपणे बोलत राहिले. देशातील राजकारणाविषयी ते जागरूक होते. त्याबाबत त्यांची मते टोकदार होती. 2016 च्या ‘फोर्ब्स’च्या जगातील श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये राहुल बजाज यांचा समावेश होता, पण देशभक्ती, उद्योगावरील निष्ठा, विकासाची दृष्टी हीच खरी त्यांची श्रीमंती होती. राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योग क्षेत्रातला उत्तुंग माणूस निघून गेला आहे.
राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योग जगतानेच नव्हे तर देशाने एक बेडर आवाज गमावला आहे. बजाज उद्योग समूहाचे ते सर्वेसर्वा. अलीकडेच त्यांनी उद्योगाची सूत्रे दोन्ही मुलांकडे सोपवून निवृत्ती पत्करली होती, पण देशातील घटनांवर त्यांचा आवाज, त्यांची भूमिका यास महत्त्व होते. बजाज हे केवळ उद्योगपती नव्हते, ते सामाजिक जबाबदारी जाणणारे, समाज कल्याणाची जाणीव असलेले उद्योगपती होते. ‘बजाज स्कूटर’च्या माध्यमातून मध्यमवर्गीयांच्या आयुष्याला त्यांनी गती आणली. काही दशकांपूर्वी स्वतःचे वाहन असणे हे मध्यमवर्गीयांचे स्वप्न होते. ज्यांना चारचाकी वाहन घेणे शक्य नव्हते, त्यांच्यासाठी बजाज यांनी ‘चेतक’ स्कूटर आणली. ‘हमारा बजाज’च्या माध्यमातून त्यांनी समस्त मध्यमवर्गीयांना दुचाकीचे स्वार केले. बजाज यांनी इटालियन व्हेस्पाचे ‘चेतक’ या देशी रूपात सादरीकरण केले. ‘चेतक’ हा वीर महाराणा प्रताप यांचा झुंजार घोडा. त्याच ‘चेतक’ नावाने त्यांनी स्कूटर बाजारात आणली. बजाजची चेतक स्कूटर खरेदी करणे हे त्या वेळी हिंदुस्थानातील मध्यमवर्गीय कुटुंबाचे प्रतिष्ठेचे लक्षण बनले होते. ऑटोमोबाईल म्हणजे वाहन क्षेत्रात बजाज उद्योगाने क्रांती केली. बजाज कुटुंबाचे नाते देशाच्या स्वातंत्र्यलढय़ाशी होते. जमनालाल बजाज हे राहुल यांचे आजोबा. जमनालाल यांनी महात्मा गांधींबरोबर स्वातंत्र्यलढय़ात सहभाग घेतला. ते
गांधींच्या विचारांचे पाईक
होते. पुढे विनोबा भावे यांच्याबरोबर सर्वोदय चळवळीत उतरले. गांधी विचारांचा पगडा राहुल बजाज यांच्यावरदेखील बसला. ते बेडरपणे सत्य आणि स्पष्ट बोलत. आपली मते परखडपणे मांडताना कोणाला काय वाटेल याची पर्वा त्यांनी कधीच केली नाही. राहुल यांची नाळ महाराष्ट्राशी होती. बजाज उद्योग समूह पुण्याजवळ आकुर्डी येथे उभा राहिला व विस्तारला. मराठवाडय़ातही संभाजीनगरजवळ वाळूज येथील बजाजच्या प्रकल्पामुळे मोठीच औद्योगिक क्रांती झाली. त्याला जोडून अनेक छोटे-मोठे उद्योग उभे राहिले. राहुल बजाज यांनी उद्योजक म्हणून जागतिक स्तरावर काम केले. राहुल हे 1980-82 दरम्यान मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रीकल्चरचे अध्यक्ष होते. देशभरात आज रिक्षाचालकांना मोठा रोजगार मिळाला आहे. त्या वेळी अनेक राज्यांत माणसे सायकल रिक्षा चालवत किंवा स्वतः धावत पळत रिक्षा ओढीत. बजाज यांनी बाजारात तीनचाकी रिक्षा आणल्या. याच रिक्षा उद्योगाने देशातील कोटय़वधी बेरोजगारांना आत्मनिर्भर बनवले आहे. रिक्षाच्या माध्यमातून त्यांनी गरीबांना स्वयंपूर्ण बनवले. परदेशातही त्यांच्या रिक्षा निर्यात होत. सरकारसमोर पुढे पुढे करणे हा त्यांचा स्वभाव नव्हता. ते शांतपणे काम करीत. बजाज फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य करीत. त्याचीही वाच्यता ते करीत नसत. राहुल बजाज हे सामाजिक कार्यात कसे दिलदार होते याची एक आठवण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सांगितली आहे. उत्तम गुणवत्ता असलेल्या
खेड्यातील मुली
पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या प्रवेश परीक्षेत यश संपादन करतात, पण एकटय़ा दुकटय़ा मुलीला शिक्षणासाठी पुण्यामध्ये पाठविणे सुरक्षित वाटत नाही म्हणून गावातले पालक त्यांना पाठविण्यास राजी नसत. मुलींचे वसतिगृह बांधणे आवश्यक असल्याचे बजाज यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ 50 कोटी रुपये दिले होते. उदारीकरणाचे ते खंबीर पुरस्कर्ते होते. पंतप्रधान असोत की अर्थमंत्री, औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीचे मुद्दे त्यांनी प्रत्येक व्यासपीठावर प्रभावीपणे मांडले. कामगार वर्गाशी त्यांचे नाते आपुलकीचे होते. हजारो कामगार त्यांच्या उद्योगसमूहात काम करीत, पण कामगारांच्या कल्याणाच्या योजना राबवून त्यांनी सगळय़ांना बजाज समूहाच्या कुटुंबाचा भाग बनवले. राहुल बजाज हे हिंदुस्थानी उद्योग जगताचे नेते होते. ‘बुलंद भारत की बुलंद तस्वीर, हमारा बजाज’ हीच त्यांची ओळख होती. हिंदुस्थान सरकारने त्यांचा पद्मभूषण नागरी पुरस्कार देऊन सन्मान केला. महाराष्ट्रातून ते राज्यसभेवर गेले. संसदेतही ते परखडपणे बोलत राहिले. देशातील राजकारणाविषयी ते जागरूक होते. त्याबाबत त्यांची मते टोकदार होती. 2016 च्या ‘फोर्ब्स’च्या जगातील श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये राहुल बजाज यांचा समावेश होता, पण देशभक्ती, उद्योगावरील निष्ठा, विकासाची दृष्टी हीच खरी त्यांची श्रीमंती होती. राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योग क्षेत्रातला उत्तुंग माणूस निघून गेला आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली!






























































