सामना अग्रलेख – हिंसाचाराने पेटलेली माती!

देशभरात सध्या ‘मेरी माटी मेरा देश’ हा भाजपपुरस्कृत राजकीय उत्सव सुरू आहे. आपापल्या जिल्ह्यातून मातीचा कलश घेऊन दिल्लीत भाजप कार्यकर्त्यांना आमंत्रित केले. मोदी त्यांच्यासमोर भाषण करतील, पण अनेक राज्यांतील कलशांत फक्त माती नसून महिलांचे आक्रोश, आग, ठिणग्या, निरपराध्यांचे रक्त आहे हे लक्षात घ्या. कश्मीरातील हिंसाचाराकडे, महाराष्ट्र, मणिपूरच्या आंदोलनाकडे बेफिकिरीने पाहणाऱ्या सरकारला देशाच्या मातीचे मोल काय कळणार?

मोदी सरकारने विरोधकांना लगाम घालण्यापेक्षा दहशतवादी आणि अतिरेक्यांना जेरबंद करण्याची गरज आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात गुंतून पडले असताना तिकडे जम्मू-कश्मीरात रक्तपात, हिंसाचार, हत्यासत्राचा उद्रेक झाला आहे. 24 तासांत तिसरा आतंकी हल्ला झाला आहे. श्रीनगरमध्ये आपल्या लहान मुलासमवेत क्रिकेट खेळत असलेल्या इन्स्पेक्टर मसरूर अहमद यास अतिरेक्यांनी दिवसाढवळ्या गोळ्या घालून ठार केले. ही बातमी भाजपच्या अंधभक्तांनी नजरअंदाज केलेली दिसते. मसरूरच्या जागी एखादा महादेव सिंग, यमुना प्रसाद मारला गेला असता तर भाजपने पाकड्यांच्या आतंकवादावर नरडी फाडली असती. मसरूर अहमदच्या हौतात्म्यावरील रक्ताचे शिंपण ताजे असतानाच पुढच्या चोवीस तासांत पुलवामात अतिरेक्यांनी उत्तरेचा मजूर मुकेश कुमार याला ठार केले. मंगळवारी बारामुल्ला जिह्यात गुलाम मोहम्मद दार या पोलिसाची अतिरेक्यांनी हत्या केली. याचा अर्थ असा की, पुन्हा एकदा अतिरेकी बेलगाम सुटले आहेत. कश्मीरात पुन्हा एकदा ‘टार्गेट किलिंग’ सुरू झाले काय? अशी चिंता वाटू लागली आहे. सरकार राजकारणातील विरोधकांना जेरबंद करण्यात आणि निवडणूक प्रचारात अडकून पडले आहे व जम्मू-कश्मीर, महाराष्ट्रात आणि मणिपुरात भडका उडाला आहे. देशाची अंतर्गत सुरक्षा, कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडून पंतप्रधान आणि गृहमंत्री राजकारणात गुंतून पडले असतील तर देशात दुसरे काय घडायचे? मोदी इस्रायल-हमास युद्धावर चिंता व्यक्त करतात, पण मणिपूर, महाराष्ट्र, जम्मू-कश्मीरातील हिंसाचारावर मौन बाळगतात. गृहमंत्री शहा राजकीय विरोधकांचा भ्रष्टाचार कुदळ-फावडी घेऊन खणून काढतात व

विरोधी पक्षांच्या लोकांना

तुरुंगात टाकतात, पण देशात अतिरेकी व धर्मांधांना मोकाट सोडतात. केरळात बॉम्बस्फोट झाला. त्यात दोन ठार व 50 जण जखमी झाले. केरळात भाजपचे सरकार नाही. त्यामुळे भाजपने केरळातील दहशतवादी हल्ल्यावर थयथयाट केला आहे, पण हेच लोक मणिपूर, जम्मू-कश्मीर, महाराष्ट्रावर बोलत नाहीत. अतिरेक्यांचे दुस्साहस कश्मीर खोऱयात वाढले आहे. गेल्या चार महिन्यांत पंचवीसपेक्षा जास्त लष्करी अधिकाऱयांना अतिरेक्यांकडून प्राण गमवावे लागले. अनेक भागांत अतिरेकी हल्ले झाले. पाकिस्तान सीमेपलीकडून संघर्ष विरामाचे रोज उल्लंघन करीत आहे. कश्मीरात अतिरेकी अचानक कोठूनही येतात व अंदाधुंद गोळीबार करून गायब होतात. त्यामुळे सरदार पटेलांना आदर्श मानून काम करणाऱया मोदी सरकारचे पोलाद कश्मीरातील बर्फाप्रमाणे वितळून गेले आहे. कश्मीरातून 370 कलम हटवून चार वर्षे होत आली तरी केंद्र सरकार येथे विधानसभेच्या निवडणुका घेऊ शकलेले नाही. राज्यपालांच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. सरकार मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घ्यायला घाबरत आहे, तसे जम्मू-कश्मीरात निवडणूक घ्यायला घाबरत आहे. 2014 पासून कश्मिरी जनतेला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? कश्मिरी पंडितांची घरवापसी तर झाली नाहीच, उलट त्यांचे हाल जास्तच वाढले. खोऱयातील व्यापार, उद्योग, व्यवहार आजही सुरळीत नाही. इंटरनेट सेवा बंद आहे. दळणवळणावर निर्बंध आहेत. 370 कलम हटवल्यावर ना तेथील तरुणांच्या हातास काम मिळाले, ना तेथे नवे उद्योग-व्यवसाय आले. आजही तेथे

लष्कराच्या भरवशावरच

थोडीफार कायदा-सुव्यवस्था टिकून आहे. ही बाब गंभीर म्हणावी लागेल. पंतप्रधान मोदी व त्यांच्या भाजपने कश्मीर प्रश्नाचे राजकारण केले, पण प्रश्न कायम आहे व आता मोदी मैदानातून पळून गेले आहेत. कश्मीरात पाकिस्तानचे अतिरेकी रोज हल्ले करतात व त्याच वेळी मोदी-शहांच्या अहमदाबादेत पाकिस्तानी क्रिकेट संघावर फुले उधळून, लाल गालिचे अंथरून स्वागताच्या तुताऱ्या फुंकल्या गेल्या. हा कश्मीरात हिंदूंनी व जवानांनी सांडलेल्या रक्ताचा अपमान नाही काय? पण भाजपने केलेल्या अशा प्रत्येक पापकृत्याची बकुळीची फुले होतात व अंधभक्त त्या सुगंधाच्या नशेत तरंगत असतात. राष्ट्रभक्तीचा मक्ता घेऊन निवडणूक प्रचारात फिरणाऱ्यांना कश्मीरातील किंकाळ्या दिसू नयेत, हे धक्कादायक आहे. कश्मीरचा प्रश्न आता भाजपच्या ‘अजेंड्या’वरून सटकला आहे. कश्मीरचा तंबोरा वाजवून मते मिळणार नाहीत. त्यामुळे त्यांचे लक्ष अयोध्येतील राममंदिराकडे आहे, पण कश्मीरात मारले जाणारे त्याच श्रीरामाचे भक्त आहेत हे ते विसरले असावेत, की जो भाजपचा अंधभक्त तोच रामभक्त मानला जाईल, असा फतवा या मंडळींनी काढला आहे? देशभरात सध्या ‘मेरी माटी मेरा देश’ हा भाजपपुरस्कृत राजकीय उत्सव सुरू आहे. आपापल्या जिल्ह्यातून मातीचा कलश घेऊन दिल्लीत भाजप कार्यकर्त्यांना आमंत्रित केले. मोदी त्यांच्यासमोर भाषण करतील, पण अनेक राज्यांतील कलशांत फक्त माती नसून महिलांचे आक्रोश, आग, ठिणग्या, निरपराध्यांचे रक्त आहे हे लक्षात घ्या. कश्मीरातील हिंसाचाराकडे, महाराष्ट्र, मणिपूरच्या आंदोलनाकडे बेफिकिरीने पाहणाऱ्या सरकारला देशाच्या मातीचे मोल काय कळणार?