साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांची तब्येत पुन्हा बिघडली, एम्समध्ये दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांची तब्येत पुन्हा बिघडली असून त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साध्वी यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांना प्रायव्हेट वॉर्डात ठेवले असून एम्सचे अधिष्ठाता डॉ. रणदीप गुलेरिया स्वत: त्यांच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून आहेत.

‘साध्वी प्रज्ञा यांना शुक्रवारी संध्याकाळी 4.15 वाजाता एम्स मध्ये दाखल करण्यात आले. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता तसेच त्यांचा रक्तदाबही वाढला होता. त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर डॉ.रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वात उपचार करण्यात येणार असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.

डिंसेबर महिन्यात साध्वी प्रज्ञा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्या तब्बल दोन महिने रुग्णालयात दाखल होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. मात्र त्यानंतर आता पुन्हा त्यांची तब्येत बिघडली आहे. 50 वर्षीय साध्वी प्रज्ञा यांना बरेच आजार आहेत. त्यांना दमा, हायपरटेंशन, मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच इतरही काही व्याधी आहेत असे समजते.