अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी कर्मचाऱयांना डिसेंबर महिन्याचा थकलेला पगार आज मिळाला. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा थकीत पगार चुकता करण्यासाठी सकाळी 300 कोटी रुपयांचा निधी वळता केला. त्यामुळे दुपारनंतर कर्मचाऱयांच्या खात्यावर पगाराची रक्कम जमा झाली.

एसटी कर्मचाऱयांचा पगार प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला होतो. मात्र आर्थिक चणचणीमुळे पगार न झाल्याने अधिकारी-कर्मचाऱयांमध्ये मोठी नाराजी होती. आज पगार खात्यावर जमा झाल्याने कर्मचाऱयांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, वेतन आणि अन्य थकाबाकी कर्मचाऱयांना देण्यासाठी एसटी महामंडळाने शासनाकडे 950 कोटी रुपयांची मागणी केली होती. तसेच सरकारी कर्मचाऱयांप्रमाणे वेतन आणि इतर लाभ मिळावे यासाठी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱयांनी तब्बल सहा महिने संप केला होता. त्यानंतर कर्मचाऱयांच्या वेतनात काहीशी वाढ करून यावर तोडगा काढला होता. तसेच एसटी महामंडळ चार वर्षांत फायद्यात येईल, या अटीवर कर्मचाऱयांच्या वेतनासाठी निधी देण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली होती. त्यानुसार दर महिना वेतनासाठी 360 कोटी रुपये दिले जात होते, मात्र जुलै 2022 पासून 100 कोटी निधीच मिळत आहे.