
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. या मुद्द्यावर शिंदे फडणवीस सरकारकडून सारवासारव केली जात आहे. आठ दिवस उलटूनही भगतसिंह कोश्यारी यांच्यावर राज्य सरकारकडून कोणतीही कारवाई न केल्याने विविध स्तरातून संताप व्यक्त होत आहे. आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करून राज्य सरकारला इशारा दिला आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच! या ट्विट मध्ये त्यांनी #कोश्यारी_हटाओ हा हॅशटॅग वापरत निषेध व्यक्त केला आहे.






























































