वानखेडेंना 20 फेब्रुवारीपर्यंत अटक करणार नाही; ईडीची हायकोर्टात हमी

एनसीबीच्या मुंबई युनिटचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना 20 फेब्रुवारीपर्यंत अटक करणार नाही, अशी हमी ईडीने गुरुवारी उच्च न्यायालयात दिली. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीशी संबंधित 25 कोटींच्या लाच प्रकरणात ईडीने वानखेडेंविरुद्ध आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत.

ईडीचा गुन्हा रद्द करण्याची मागणी करीत वानखेडे यांनी अॅड. करण जैन यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर गुरुवारी न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी वानखेडे यांच्यातर्फे अॅड. आबाद पोंडा यांनी ईडीच्या कारवाईवर आक्षेप घेतला. वानखेडेंना ईडीकडून नाहक त्रास दिला जात असल्याचे अॅड. पोंडा यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर ईडीतर्फे अॅड. संदेश पाटील यांनी बाजू मांडली. ईडीने गुन्हा दिल्लीत वर्ग केल्याने वानखेडेंनी तिथल्या न्यायालयात दाद मागावी, असा युक्तिवाद त्यांनी केला.