वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या भाजप नेत्यांचा शिवसैनिकांनी घेतला समाचार, सांगलीत कोश्यारी, बोम्मई, त्रिवेदींच्या प्रतिमांचे दहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून ताबडतोब हटवून त्यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी, या मागणीसह भाजपाचे प्रवक्ते त्रिवेदी आणि कर्नाटकचे बेताल मुख्यमंत्री बोम्मईंचा जोरदार निषेध करत त्यांच्या प्रतिमांना आज सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन करीत त्यांच्या प्रतिमेचे दहन करून जोरदार निषेध करण्यात आला.

सांगलीतील ‘बाळासाहेब ठाकरे चौका’त आज शिवसेनेच्या वतीने जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हा संघटक दिगंबर जाधव, उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, महादेव मगदूम, महिला आघाडीच्या सुजाता इंगळे, मिरज तालुकाप्रमुख संजय काटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

शहरप्रमुख मयूर घोडके, रावसाहेब खोचगे, हरिदास लेंगरे, रुपेश मोकाशी, सुरेश साखळकर, उपशहरप्रमुख महादेव हुलवान, नितीन काळे, पप्पू शिंदे, शहर समन्वयक प्रसाद रिसवडे, अनिल शेटे, दीपक वाघमारे, उपजिल्हा संघटक संतोष पाटील, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक मनीषा पाटील, शहर संघटक सुनीता पाटील, शिवसेना शहर संघटक अमोल कांबळे, सनत पाटील, मिरज शहरप्रमुख शकिरा जमादार, उपतालुकाप्रमुख माधुरी चव्हाण, गुंठेवारी समितीचे गजानन सातपुते, शहर संघटक हरिदास पडळकर, मिरज उपशहरप्रमुख किरण कांबळे उपस्थित होते.

गेली वर्षानुवर्ष बेळगाव महापालिकेवर मराठी माणसाचा भगवा फडकतोय आणि प्रत्येक महासभेत प्रत्येक नगरसेवक पहिल्यांदा ‘बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ हा ठराव करून बेळगाव महापालिका राज्य सरकारकडे पाठवते. बहुदा या गोष्टीचा यांना विसर पडलेला आहे. कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिक जनता महाराष्ट्रात जाण्यासाठी आतुर आहे. मात्र, महाराष्ट्रात असणारे कन्नड भाषिक कर्नाटकात जायला तयार नाहीत. हे शल्य मनात बाळगून बोम्मई यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कर्नाटकात काहीतरी अजेंडा घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्र पेटवण्याचे कारस्थान सुरू केले आहे. राज्यपाल कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते त्रिवेदींच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचा चंगच जणू भाजप नेतृत्वाने बांधलेला आहे. यांना जनतेच्या प्रश्नांशी घेणेदेणे नसून, त्यांना अशांतता पसरवायची असल्याचा आरोप अनेकांनी केला.