
शहरातील मध्यवर्ती राजवाडा चौकात पहाटे बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिक भयभीत झाले, तर वनविभाग, पोलीस आणि महापालिका प्रशासनाने बिबट्याला पकडण्यासाठी 14 तास प्रयत्न केले. सायंकाळी आठच्या दरम्यान डार्ट मारून बिबट्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तो अपयशी ठरला. यानंतर साडेनऊच्या दरम्यान पुन्हा एकदा डार्ट मारून बिबट्याला बेशुद्ध करण्यात यश आले. त्यानंतर या बिबट्याला वन विभागाने ताब्यात घेतले. बिबट्या जेरबंद झाल्याने सांगलीकरांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
राजवाडा परिसरातील राजारामबापू सहकारी बँकेच्या परिसरात बुधवारी पहाटेच्या दरम्यान काही नागरिकांना बिबटय़ाचे दर्शन झाले. त्यानंतर एका कुत्र्याला ठार मारून हा बिबट्या याच परिसरातील आयसीआयसीआय बँक आणि पटेल चौक या परिसरात गायब झाला. पटेल चौक, रॉकेल लाईन, बीएसएनएल ऑफिस परिसरात बिबट्याचा वावर असण्याची शक्यता धरून वन विभाग आणि पोलिसांनी सकाळपासून शोधमोहीम सुरू केली. बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शहरात बिबट्या आल्याची माहिती कळताच, पोलीस, वन विभाग आणि महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेत सर्व यंत्रणा कामाला लावली. पहाटेपासून सायंकाळपर्यंत बिबटय़ाच्या शोधासाठी मोहीम राबविण्यात आली. दरम्यानच्या काळात या परिसरातील रस्ते सील करून वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. कोल्हापूरहून वन विभागाचे विशेष पथक सांगलीत दाखल झाले. बिबटय़ाला डार्टद्वारे बेशुद्ध करण्याची यंत्रणाही कार्यरत करण्यात आली. पिंजरे, जाळ्या अशा सर्व यंत्र यंत्रणांसह बिबटय़ाला पकडण्यासाठी तब्बल 14 तासांहून अधिक काळ यंत्रणा कार्यरत होती. सायंकाळी आठच्या सुमारास बिबटय़ाला डार्ट मारण्यात आला. मात्र, त्याचा बिबटय़ावर काहीही परिणाम झाला नाही. यानंतर रात्री साडेनऊला पुन्हा एकदा डार्ट मारून बिबटय़ाला बेशुद्ध करण्यात यश आले.
आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, पोलीस उपअधीक्षक अजित टिके, वन विभागाचे सांगली व कोल्हापूर येथील अधिकारी उपस्थित होते.
सोशल मीडियावर अफवांचा धुमाकूळ
सांगली शहरातील गजबजलेल्या नागरी वस्तीत बिबटय़ा घुसल्याच्या घटनेने सांगलीकर नागरिक भयभीत झाले असतानाच, सोशल मीडियावरून बिबट्याचा पोलिसावर हल्ला, बिबट्या जेरबंद, बिबट्याबरोबर दोन बछडे, बिबट्याला गोळ्या घालण्यासाठी शार्प शूटर दाखल, अशा अफवांचा धुमाकूळ दिवसभर सुरू होता. सोशल मीडियावरील बातम्यांचा खरेखोटेपणा पाहण्यासाठी अनेक सूज्ञ नागरिक वृत्तपत्र कार्यालयांकडे फोनवरून विचारणा करीत होते.
सब फायर ऑफिसर बिबट्याला शोधतानाच झाले निवृत्त
महापालिका अग्निशमन विभागाचे सब फायर ऑफिसर आर. डी. चव्हाण हे आज 31 मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. आज सेवेच्या शेवटच्या दिवशी दिवसभर राजवाडा चौकात बिबटय़ाच्या शोधमोहिमेत ते कर्तव्य बजावत होते. सायंकाळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते चव्हाण यांचा सत्कार करीत त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी नगरसेवक अभिजित भोसले, मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे आणि अग्निशमन कर्मचारी उपस्थित होते.



























































