मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या विश्वस्तपदी संजय राऊत, अनिल देसाई आणि सुप्रिया सुळे यांची फेरनिवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा दादर येथील संस्थेच्या सभागृहात पार पडली. संस्थेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत पुढील पाच वर्षांसाठी संस्थेच्या विश्वस्तपदी शिवसेना खासदार संजय राऊत, अनिल देसाई राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे आणि अरविंद तांबोळी यांची फेरनिवड करण्यात आली.

या वेळी संस्थेचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे यांनी ग्रंथसंग्रहालयाच्या डिजिटलायझेशन प्रकल्पाची माहिती दिली. ग्रंथसंग्रहालयात सुमारे सहा लाखांहून अधिक पुस्तके, मासिके आणि हस्तलिखिते उपलब्ध असून, त्यातील काही साहित्य अत्यंत दुर्मीळ आहे.

या मौल्यवान शब्दसंपदेचे जतन करण्यासोबतच जगाच्या कोणत्याही भागातील वाचक आणि अभ्यासकांना हे साहित्य इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने डिजिटलायझेशनचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने पाच कोटी रुपये मंजूर केले असून, त्यापैकी तीन कोटी रुपये संस्थेला प्राप्त झाले आहेत. या प्रकल्पांतर्गत एकूण एक कोटीहून अधिक पुस्तकांची पाने स्कॅन करण्यात येणार आहेत.