
अन्नधान्य महाग झाले, टॅक्सी महाग झाली, रिक्षाचा प्रवास महाग झाला. देशात काय स्वस्त राहिले आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला. तसेच सामान्य माणसाचे कंबरडे मोडण्याचे पाप हे सरकार करत आहे अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली.
मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महागाईविरोधात आंदोलन करण्यात आले. तेव्हा सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी सरकारला मतदान केले, त्यापैकी तब्बल 80 लाख ते एक कोटी महिलांची नावे या योजनेतून कमी करण्यात आली आहेत. आज त्याच लाडक्या बहिणींसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. अन्नधान्य महाग झाले, टॅक्सी महाग झाली, रिक्षाचा प्रवास महाग झाला. देशात काय स्वस्त राहिले आहे, हे मला सांगा.”
“सामान्य माणसाचे कंबरडे मोडण्याचे पाप हे सरकार करत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. कर्जमाफीचा मोठा गाजावाजा करण्यात आला; मात्र कष्ट करणाऱ्या, मातीशी इमान राखणाऱ्या आणि आपल्या सर्वांचा अन्नधान्याचा प्रश्न सोडवणाऱ्या शेतकऱ्याला न्याय मिळालेला नाही. दुसरीकडे, शहरांमध्ये कष्ट करण्यासाठी आलेल्या कामगारांनाही महागाईची झळ दररोज सहन करावी लागत आहे. त्यामुळे जगायचे कसे, असा मोठा प्रश्न सर्वसामान्यांसमोर निर्माण झाला आहे.”
एसआयआरच्या मुद्द्यावर बोलताना सुळे म्हणाल्या, “आम्ही आपापल्या मतदारसंघातील एसआयआरची माहिती घेत आहोत. मी स्वतः माझ्या मतदारसंघात एसआयआरचे काम कसे सुरू आहे, यावर दररोज लक्ष ठेवून आहे. त्यामुळे एसआयआरच्या बाबतीत प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे आहे. प्रत्येक मतदाराने मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे तपासले पाहिजे.”
“माझी प्रत्येक नागरिकाला हात जोडून विनम्र विनंती आहे की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून एक मताचा मोठा अधिकार दिला आहे. कृपया हा अधिकार गमावू नका. मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे तपासा. नाव दुबार असेल तर दोन्हीपैकी एका ठिकाणीच ठेवा. नाव यादीतून वगळले गेले असेल किंवा काही त्रुटी असतील, तर त्या तातडीने दुरुस्त करून घ्या. अजून आपल्या हातात एक महिन्याचा वेळ आहे.”
राज्यातील विविध समाजघटकांच्या आंदोलनांवरही त्यांनी भाष्य केले. “या राज्याचे दुर्दैव आहे की, सातत्याने मराठा समाज असो, ओबीसी समाज असो, आदिवासी मुलं असोत, आमच्या लाडक्या बहिणी असोत किंवा आश्रमशाळेतील मुलं असोत, सर्वच जण आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. समाजातील प्रत्येक घटक आंदोलन करत आहे. मात्र, जोपर्यंत आंदोलन शिगेला पोहोचत नाही, तोपर्यंत झोपल्याचे सोंग घेतलेल्या या सरकारला जाग येत नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.



























































