महाराष्ट्राचे गृहमंत्री कोणाच्या खिशात? भाजप नेत्याच्या बारमधील राड्यानंतर राऊतांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप नेत्याचा बारमधील पोलिसांसोबतच्या गैरवर्तनाचा व्हिडीओ शेअर करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली. हा व्हिडीओ आपण राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला असून त्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्याचे राऊत म्हणाले.

रविवारी रात्री संजय राऊत यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता राऊत म्हणाले की, मुंबईत भाजपचा एक नेता पहाटे तीन वाजेपर्यंत जिथे ड्रग्स विकले जाते त्या बारमध्ये राडा घालत होता. कायद्यानुसार बार एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. पोलीस बार बंद करण्यासाठी गेल्यावर त्यांच्यासोबत झटापट केली, अर्वाच्च शब्द वापरले, अपमान केला.

संभाजी ब्रिगेडच्या सचिन कांबळे यांनी तो व्हिडीओ आपल्याकडे पाठवला आणि स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणारा भाजप नेता पोलिसांशी झटापट करत होता, शिव्या घालत होता, वर्दीवर हात टाकत होता, असे मला सांगितले. जिथे हा प्रकार घडला त्या बारमध्ये वाईट गोष्टी चालतात, अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन केले जाते असे बोलतात. त्यामुळे हे महाशय तिथे काय करत होते याची चौकशी व्हायला हवी. बारमधील सीसीटीव्ही ताब्यात घ्या. आपण हा हा व्हिडीओ राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला असून त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे, असेही राऊत यांनी सांगितले.

ती देशाची ‘मन की बात’ नाही तर…

‘मन की बात’च्या 100व्या भागाचा देशभरात उत्सव करण्यात आला. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, कोरोना काळामध्ये थाळ्या वाजवण्याचा उत्सव केला, तसा काल टाळ्या वाजवण्याचा करण्यात आला. पंतप्रधानांचे भाषण नक्की ऐकावे, पण चित्रपट कलाकारांसह लोकांना बसवून जो उत्सव करण्यात आला त्याची या देशाला गरज होती का? देशाला नाही तर भाजपला गरज म्हणून हा उत्सव करण्यात आला. ती देशाची ‘मन की बात’ नाही तर पक्षाची होती, असे राऊत म्हणाले. तसेच सध्या देशाला रोजगार निर्मितीची, सत्यपाल मलिकांनी पुलवामा हल्ल्याबाबत केलेल्या गौप्यस्फोटासंबंधी चौकशीची, गरिबी हटण्याची आणि संविधान वाचवण्याची गरज आहे. मन की बातच्या मागेपुढे फेरा मारण्याऐवजी जन की बात ऐका, असेही राऊत म्हणाले.

सरकार गेंड्याच्या कातडीचे

खारघर, बारसू प्रकरणी सरकार संवेदनशील नाही? असे विचारले असता राऊत म्हणाले की, हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. सरकारला मन आणि ह्रदय असते तर खारघरच्या 16 श्री सेवकांच्या वधाच्या, हत्येचे प्रकरण त्यांनी असे निर्दयीपणे, पैशाच्या जोरावर दडपले नसते. ज्या पद्धतीने चौकशी व्हायला हवी होती आणि सदोष मनुष्यवधानाबद्दल सरकारने प्रायश्चित्त घ्यायला हवे होते, ते सरकार घ्यायला तयार नाही. सरकारला पैशांची आणि सत्तेची मस्ती आली आहे.